यंदा नदी-नाले तुंबणार!
By admin | Published: March 26, 2015 10:45 PM2015-03-26T22:45:25+5:302015-03-26T22:45:25+5:30
वसई-विरार पूर्व भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या नदी व नाल्यामध्ये अनधिकृत बांधकामे तसेच तबेल्यातील सांडपाणी टाकण्यात येत असल्यामुळे पावसाळी पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद झाले आहेत.
दीपक मोहिते ल्ल वसई
वसई-विरार पूर्व भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या नदी व नाल्यामध्ये अनधिकृत बांधकामे तसेच तबेल्यातील सांडपाणी टाकण्यात येत असल्यामुळे पावसाळी पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पूर्व भागातील अनेक भागात पूर येण्याची शक्यता आहे. अनधिकृत तबेल्यातून निघणारे मलमूत्र व शेण नदीनाल्यात सर्रास टाकले जात आहे. भविष्यात पर्यावरणाचा प्रश्नही गंभीर होणार आहे. काही वर्षापूर्वी कामण नदीमध्ये प्रचंड प्रमाणात शेण टाकण्यात आल्याने नदीचे पात्रच आता आटले आहे.
एकेकाळी कामण नदीमध्ये आदिवासी समाज मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे. तर याच नदीच्या पाण्यावर कामण, चिंचोटी व अन्य भागातील शेतकरी भातशेती करत असत. कालांतराने मुंबईतील तबेले येथे स्थलांतरीत झाले व त्यांनी तबेल्यातील शेण व सांडपाणी या नदीत सोडल्यामुळे नदी आटली व मासेमारी थंडावली. त्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबांना रोजगाराच्या शोधात आपली मूळ गावे सोडावी लागली. शेती सिंचनासाठी पाणीच नसल्यामुळे शेतीचे क्षेत्रही प्रचंड प्रमाणात कमी होत गेले. या भागातील नाले हळुहळू अरूंद झाले. नाल्यामध्ये सरसकट बांधकामे केल्यामुळे पावसाळी पाणी निचरा वेगाने होत नाही. या नाल्यामार्फत शहर व ग्रामीण भागातील पावसाळी पाणी खाडीमार्गे समुद्राला जात असते. सन १९८० पर्यंत ही प्रक्रिया सुलभ रित्या सुरू होती. कालांतराने तबेले व औद्योगिक कारखाने यांचे आगमन झाले व नदीनाल्यांची वाताहात झाली. अनेक नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे उभी राहत आहेत. या बांधकामावर नियंत्रण आणण्याबाबत महानगरपालिका प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नाही. त्यामुळे पावसाळ्यात अनेक भाग पाण्याखाली जाऊन हाहाकार उडण्याची शक्यता आहे.
४अनधिकृत तबेल्यातून निघणारे मलमूत्र व शेण नदीनाल्यात सर्रास टाकले जात आहे. भविष्यात पर्यावरणाचा प्रश्नही गंभीर होणार आहे.
४काही वर्षापूर्वी मुंबईतील तबेले येथे आलेत व त्यांनी प्रचंड प्रमाणात शेण व सांडपाणी कामण नदीमध्ये टाकल्याने नदीपात्रची खोली घटून ते आता आटले आहे.