मुंबई : जुलै महिना सुरू होताच सर्वांना श्रावण मासाचे वेध लागतात. या श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करतात, तर अनेकजण शिव मंदिरांमध्ये पूजा-अर्चादेखील करतात. श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व असते. श्रावणी सोमवारनिमित्त नागरिक आपल्या शहरातील जवळच्या शिवमंदिरामध्ये जाऊन मनोभावे पूजा करतात. मात्र, यंदा श्रावण महिन्यातदेखील कोरोनाचे संकट कायम असल्याने मंदिरामध्ये प्रवेश मिळेल का, असा प्रश्न भक्तांमध्ये उपस्थित होत आहे.
यंदा श्रावण महिना २५ जुलैपासून सुरू होत आहे. २२ ऑगस्टपर्यंत हा महिना असणार आहे. श्रावण महिन्यात मंदिरावर अवलंबून असणाऱ्या हार, फुले, मिठाई, नारळ या विक्रेत्यांचा व्यवसायदेखील चांगला होतो. या विक्रीमुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. मात्र, यंदा त्यांच्या पदरी निराशाच येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
श्रावण सोमवार
पहिला - २६ जुलै
दुसरा - २ ऑगस्ट
तिसरा -९ ऑगस्ट
चौथा -१६ ऑगस्ट
२५ पासून श्रावण
२५ जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. महिनाभर सर्व मंदिरांमध्ये पूर्जाअर्चना होत असते. या काळात मंदिर परिसरात आर्थिक उलाढाल वाढत असते. विशेषतः सोमवारी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र यंदा कोरोनामुळे मंदिरे उघडली नसल्याने भक्तांना देवाचे दर्शन नवीनच श्रावण महिना काढावा लागणार आहे. कोरोना संसर्ग रोखणे गरजेचे असले तरीदेखील मंदिरावर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबांचा या महिन्यात व्यवसाय बुडणार आहे.
----------
मंदिरात येणाऱ्या भक्तांवरच आमचा व्यवसाय अवलंबून असतो. मागील दोन वर्षे व्यवसाय पूर्णपणे ठप्प असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सरकारने आमच्या व्यथांकडे लक्ष द्यावे. तसेच मंदिरांवर व्यवसाय अवलंबून असलेल्यांना आर्थिक मदत करावी.
- उल्हास चौगुले (मिठाई व फ्रेम विक्रेते)
हारांचा व्यवसाय हा आमचा कौटुंबीक व्यवसाय आहे. घरातील सर्व सदस्य मिळून हा व्यवसाय चालवितो. त्यामुळे या व्यवसायावरच आमची उपजीविका चालते. मात्र, मंदिर बंद असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने आमच्या व्यथा लक्षात घेऊन मंदिरे लवकरात लवकर सुरू करावीत.
- रेवती साळवी (हार विक्रेते)
फोटो - बाबुलनाथ मंदिर, मुंबई