लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगावचे माजी आमदार स्व. नंदकुमार काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आकार क्रिएशन या प्रकाशन संस्थेतर्फे दरवर्षी दिले जाणारे गौरव पुरस्कार जाहीर झाले असून, यंदाचा मानाचा ‘आकार जीवन गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडके यांना जाहीर झाला आहे, तर ‘कला गौरव पुरस्कार’ प्रसिद्ध तालवादक, संगीत संयोजक अनुपम घटक यांना आणि ‘समाज गौरव पुरस्कार’ बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांना रविवारी (दि. १७) सायंकाळी ६ वाजता, डायमंड बँक्वेट हॉल, गोखले कॉलेजसमोर, जुनी एमएचबी कॉलनी, बोरिवली (प). येथे एका जाहीर समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
‘ये जमीं ये आसमां...’, ‘कलभी आजभी, आजभी कलभी’ ‘जो ओके साबुनसे नहाये, कमलसा खिल जाये’ यासारख्या जवळपास चार हजारांहून जास्त जाहिरात गीतं-जिंगल्स गाणारे आणि मराठी चित्रपटसृष्टीत ‘लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज’ असणारे ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडकेंना ‘नंदकुमार काळे स्मृती-आकार जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. गोरेगाव विधानसभा मतदारसंघात लोककार्य करून अबालवृद्धांमध्ये परिचित असलेल्या स्व.नंदकुमार काळे यांच्या स्मृती चिरंतन जपण्याचा प्रयत्न आकार क्रिएशनचे प्रभाकर सूर्यवंशी गेली तीन वर्षे सातत्याने करत आहेत. या समारंभात आकार क्रिएशनचा ‘आकार’ हा वार्षिकांकही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केला जाणार आहे.