यंदाही अंदाजपत्रकाला मंजूरी नाही
By admin | Published: March 20, 2015 10:48 PM2015-03-20T22:48:13+5:302015-03-20T22:48:13+5:30
ठाणे महापालिका आयुक्तांनी २०१५-१६ चे १९९८ कोटींचे मूळ अंदाजपत्रक फेबु्रवारी महिन्यात स्थायी समितीसमोर सादर केले आहे.
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्तांनी २०१५-१६ चे १९९८ कोटींचे मूळ अंदाजपत्रक फेबु्रवारी महिन्यात स्थायी समितीसमोर सादर केले आहे. परंतु, त्यावर अद्याप स्थायी समितीसह महासभेतही चर्चा होऊ शकलेली नाही. सध्याची परिस्थिती पाहता या महिनाअखेरीस त्यावर चर्चा होईल किंवा नाही, याबाबत मात्र साशंकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाचे अंदाजपत्रक यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात मंजूर झाले. तर त्यापूर्वीचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी दिवाळी उजाडली होती. त्याचाच कित्ता यंदाही गिरवला जात असल्याने महासभेत जोपर्यंत ते मंजूर होत नाही, तोपर्यंत आयुक्तांच्याच ‘बजेट’नुसार शहरात कामे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामांनादेखील खीळ बसणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी १९९८ कोटींचे मूळ अंदाजपत्रक स्थायीला सादर केले. त्यावर अपेक्षेप्रमाणे स्थायीत चर्चा होऊन मार्चअखेरपर्यंत ते महासभेत मंजूर होणे गरजेचे आहे. परंतु, मार्च संपत आला तरीदेखील अद्यापही स्थायी समितीत त्यावर चर्चा झालेली नाही. त्यामुळे मार्चअखेर त्याला मंजुरी मिळेल का, याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात वाढ करून महासभेने ते २७९६ कोटींचे केले होते. परंतु, पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकानुसारच शहरात कामे सुरू होती. याच मुद्यावरून स्थायी समिती आणि महासभेत नगरसेवकांनी अनेक वेळा प्रभागातील कामे करण्यासाठी निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाला अडचणीत आणले. अखेर, २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रक सादर करताना २०१४-१५ चे सुधारित अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. या वेळी तब्बल ११४७ कोटींची तूट त्यात दिसून आली. दरम्यान, २०१३-१४ चे अंदाजपत्रकदेखील दिवाळीच्या कालावधीत मंजूर झाले होते. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)