Join us

यंदाचा बालदिन हाेणार ‘ऑनलाइन’ साजरा, शिक्षण विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 3:40 AM

Children's Day : राज्यातील सर्व शाळांमधील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ ते १४ नोव्हेंबरदरम्यान भारताचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत पंडित नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन सप्ताह साजरा करण्यात येईल.

मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे १४ नोव्हेंबर, बालदिनही सोशल मीडियाच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.राज्यातील सर्व शाळांमधील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ ते १४ नोव्हेंबरदरम्यान भारताचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत पंडित नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन सप्ताह साजरा करण्यात येईल. याअंतर्गत पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ‘मी नेहरू बोलतोय’ या विषयावर तीन मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करायचा आहे. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ‘पत्रलेखन’ हा विषय असून, त्यांना चाचा नेहरूंना पत्र लिहायचे आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कविता वाचन आणि नेहरूंच्या जीवनावर एकपात्री प्रयाेग करायचा असून नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य संग्रामातील नेहरूंच्या जीवनावरील पोस्टर तयार करणे व निबंध लेखन स्पर्धा आहे. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निबंध लेखन आणि व्हिडीओ तयार करणे असे विविध उपक्रम शिक्षण विभागाकडून राबविण्यात येतील.

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना नेहरूंशी संबंधित कथा, कविता, प्रसंग सादर करणे या माध्यमातून ई-संमेलन आयोजित करता येईल.विद्यार्थ्यांनी तयार केलेले व्हिडीओ, निबंध, कविता, पत्रलेखन, ई-संमेलनाचे फोटो हे पालक, शिक्षक यांच्या फेसबुक अकाउंटवरून #baldivas२०२० या हॅशटॅगचा वापर करून अपलोड करायचे आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे व्हिडीओ व फोटो हे इन्स्टाग्राम, ट्विटरवर #baldivas२०२० या हॅशटॅगवरही अपलोड करता येतील.विशेष म्हणजे या उपक्रमासाठी तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर प्रथम ३ क्रमांक देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तिपत्रे देण्यात येतील. त्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय समित्यांचीही स्थापना करण्यात येईल.

टॅग्स :मुंबई