लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या डीवाय फेस्ट-२०२१ चे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ‘कलाराग’ने या कार्यक्रमाचे ऑनलाइन आयोजन केले होते. सध्या कला आणि कलाकार या दोघांकरिता अत्यंत कठीण वातावरण आहे. यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकार व त्यांच्यातली कला जोपासण्याचा फेस्टच्या वतीने यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
या फेस्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील फोटोग्राफी स्पर्धेला सर्व छायाचित्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिनांक २४ व २५ एप्रिल रोजी तिन्ही प्रवर्गांतील उत्तम छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन कलारागच्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. आर्किटेक्चर प्रकारातील फोटोग्राफीमध्ये जयेश खैरे, नाईट फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्रथमेश भावसार, तर रिफ्लेक्शन फोटोग्राफी स्पर्धेत अभिषेक परदेशी या स्पर्धकांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रसिद्ध छायाचित्रकार किंशुक मेहता हे या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभले होते.
एकरंग या खुल्या एकपात्री अभिनय स्पर्धेत निकिता झेपले हिच्या खतना या एकपात्री प्रयोगाला प्रथम क्रमांक मिळाला. सिने-नाट्यसृष्टीतील कलाकार नीलेश माने हे या स्पर्धेला परीक्षक लाभले होते. या स्पर्धेचे प्रसारण २४ एप्रिल रोजी कलारागच्या यू-ट्यूब चॅनलवर करण्यात आले. तसेच यंदाची विशेष आकर्षण असलेली ‘जोक्स अ पार्ट स्टँड अप कॉमेडी’ स्पर्धा प्रेक्षकांच्या हास्यकल्लोळात पार पडली. २५ एप्रिल रोजी स्पर्धकांनी ऑनलाइन सादरीकरण केले. फातिमा आयेशा यांच्या परीक्षणाखाली नेथन गोमेज याने प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व विजेत्यांना देवांशी शाह आणि झूम इन या प्रायोजकांकडून भेटवस्तू देण्यात येणार आहेत.