यंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 04:56 AM2019-08-21T04:56:35+5:302019-08-21T04:57:23+5:30
मंगळवारी दहीहंडी समन्वय समितीच्या कार्यकारिणीने पत्रकार परिषद आयोजित केली होती.
मुंबई : न्यायालयाच्या कचाट्यातून बाहेर आलेला दहीहंडी उत्सव आता कुठे पुन्हा एकदा स्थिरावतोय. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मागील ३-४ महिन्यांपासून शहर उपनगरातील गोविंदा पथके सराव करीत आहेत. त्यामुळे यंदाही राज्यात पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे आव्हान समोर असले तरी त्यांना मदतीचा हात देऊन गोविंदा पथके यंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा करणार आहेत, अशी भूमिका दहीहंडी समन्वय समितीने घेतली आहे.
मंगळवारी दहीहंडी समन्वय समितीच्या कार्यकारिणीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी सांगितले की, अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनाही आवाहन करीत आहोत, आयोजन रद्द न करता त्याच्या अतिरिक्त खर्चाला कात्री द्यावी. जेणेकरून, इतक्या वर्षांची परंपरा असलेला हा उत्सवही साजरा होईल, आणि पूरग्रस्तांनाही मदतीचा हात मिळेल़
समितीचे कार्याध्यक्ष अरुण पाटील यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी उत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन होईल म्हणून गोविंदा पथकांनी ३-४ महिन्यांपासून सरावाला सुुुरुवात केली. काही गोविंदा पथकांनी ९-१० थरांचा सरावही केला आहे. बक्षिसाची रक्कम कमी करा; परंतु आयोजन करा, असे आवाहन समितीच्या वतीने आयोजकांना करीत आहोत.
५७० पथकांचा विमा
५७० गोविंदा पथकांनी विमा काढला आहे. तर वैयक्तिक पातळीवर १६८ गोविंदा पथकांनी विमा काढल्याची माहिती विमा अधिकारी सचिन खानविलकर यांनी दिली.सिताबेन शहा मेमोरिअल ट्रस्टच्या माध्यमातून ६६, साई सेवा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून ७०, मोहित भारतीय फाउंडेशनने १६ आणि श्री मुलुंड युवक प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून ७ गोविंदा पथकांचा विमा काढण्यात आला़
गोविंदा पथकांकडून मदतीचा हात
जोगेश्वरीच्या जय जवान पथकातील गोविंदांनी पूरग्रस्त भागांत जाऊन स्वयंसेवक म्हणून काम केले. विलेपार्लेच्या पार्लेश्वर स्पोर्ट्स क्लबने २१ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केली. माझगावच्या श्री दत्त क्रीडा मंडळाने धान्य, वस्तू आणि कपडे अशा स्वरुपात पूरग्रस्तांना मदत केली. चेंबूरच्या बालवीर गोविंदा पथकाने उत्सवातून जिंकलेल्या रकमेच्या २५ टक्के निधी पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. हिंदू एकता मंच जोगेश्वरी या पथकानेही पूरग्रस्त भागांत वस्तूंच्या रुपात मदत केली आहे. तर विलेपार्ले येथील पार्लेश्वर दहींहडी पथक उत्सवातून जमणारी सर्व रक्कम लष्कराला देणार आहे.
दोन आयोजकांनी काढला विमा
स्वामी प्रतिष्ठान या आयोजकांनी २०० गोविंदा पथकांचा विमा काढला आहे. तर एका खासगी एनजी ड्रींक कंपनीने ४३ गोविंदा पथकांचा विमा काढला आहे. या दोन्ही आयोजनाच्या माध्यमातून १२ हजार १५० खेळाडूंना विम्याचे कवच मिळणार आहे.
विम्याची सक्तीच, गोविंदाला विमा कवच
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० लाख रुपयांचा विमा काढणे हितकारक आणि तितकेच बंधनकारक आहे. सरावाच्या दिवसापासून सर्व गोविंदा पथकांना विमा आवश्यक आहे. त्यामुळे आयोजक आणि गोविंदा पथकांनी विमा काढून उत्सवात सहभाग घ्यावा, असे समन्वय समितीच्या सुरेंद्र पांचाळ यांनी सांगितले.
समन्वय समितीचे आवाहन
गोविंदांची सुरक्षितता राहण्यासाठी पथकांनी हेल्मेट सेफ्टी, सेफ्टी बेल्ट, हार्नेस बेल्ट, चेस्ट गार्ड आणि प्रोटेक्टर वापरणे
आयोजकांनी वरच्या थराला चढणाऱ्या गोविंदाचे ओळखपत्र तपासणे, सुरक्षेचे नियम पाळणे
पोलीस ठाण्यातून रीतसर परवानगी घेणे, गोविंदा पथकांनी पोलीस, वाहतूक अधिकाऱ्यांना मदत करणे