मुंबई : परतीच्या पावसाने माघार घेतल्यानंतर आता मुंबईसह राज्यात आकाश मोकळे झाले आहे. मात्र, तरीही हवामानातील बदलामुळे विदर्भासह संलग्न मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे पावसाळा संपला असून, ऑक्टोबर हिट मुंबईत आणखी १५ दिवस राहणार आहे. तर दिवाळीत मुंबईकरांना बऱ्यापैकी थंडीचा अनुभव घेता येणार आहे.दिवाळीनंतर हवेत बदल जाणवू लागेल, वातावरणात गारवा येईल. मुंबईत किमान तापमान सरासरी ३ अंशांनी खाली नोंदविण्यात येईल. मुंबईत रात्री हवामान आल्हाददायक असेल. दिवाळीनंतर हवामानात आणखी घसरण होईल. त्यानंतर, कुठे मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येईल. दिवाळीत मुंबईत थंडीसाठीचे हवामान अनुकूल नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.उर्वरित महाराष्ट्राचा विचार करता, नाशिक, पुणे येथील किमान तापमानात बऱ्यापैकी घट होईल. हे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. पुढील तीन दिवसांत हवामान बदल जाणवू लागेल. रात्रीच्या तापमानात घट नोंदविण्यात येईल. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग कमी होईल आणि उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढेल. त्यामुळे हवामानात बदल होतील. किमान तापमानात घट होईल. आकाश बऱ्यापैकी मोकळे झाल्याने रात्रीच्या किमान तापमानात घट होईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गारव्याने उजाडणार यंदाची दिवाळी पहाट! ऑक्टोबर हिट मुंबईत आणखी १५ दिवस राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 7:46 AM