ठरलं! शिवाजी पार्क नाही तर या ठिकाणी आयोजित होणार शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा
By बाळकृष्ण परब | Published: October 22, 2020 01:46 PM2020-10-22T13:46:31+5:302020-10-22T13:52:07+5:30
shiv sena dasara melava News : शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, हे निश्चित झाले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
मुंबई - देशात आणि राज्यात सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या दैनंदिन व्यवहारांवर अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. याचा फटका राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, हे निश्चित झाले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
प्रसारमाध्यमांश संवाद साधताना संजय राऊत यांनी दसरा मेळाव्याबाबत सांगितले की, शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. मात्र सध्या कोरोनाचे सावट असल्याने अनेक नियमांचे पालन करावे लागत आहे. त्यामुळे शिवाजी पार्क येथे या दसरा मेळाव्याचे आयोजन करता येणार नाही. मात्र या सोहळ्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्यामुळे दसरा मेळावा आयोजित होईल. पण आम्ही नियम पाळतो. स्वत: मुख्यमंत्रीही नियमांचे पालन करत आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्याचे आयोजन नियमांचे पालन करून शिवाजी पार्कजवळ असलेल्या सावरकर स्मारक येथील सभागृहात होईल.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा कसा आयोजित होणार असा प्रश्न पडला होता. मात्र संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीमुळे दसरा मेळाव्यााबाबतचा हा संभ्रम दूर झाला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे या मेळाव्याला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे.
भाजपाशी असलेली युती मोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी महाविकास आघाडी केल्यानंतर शिवसेनेचे हिंदुत्व मवाळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर अनेक आरोप करून या सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे शिवसैनिकांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
दसरा मेळावा शंभर लोकांत करा, अन्यथा शिवसेनेवर कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिवाजी पार्कवर केवळ शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा, अन्यथा शिवसेनेला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला होता.
राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्धपौर्णिमा तथा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरी करण्यात आले आहे. त्यानुसार शिवसेनेनेही शिवाजी पार्कवर शंभर लोकांच्या उपस्थितीतच दसरा मेळावा साजरा करावा, अन्यथा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच शिवसेनेवर कारवाई करावी लागेल, असे आठवले म्हणाले होते. यावेळी राज्यातील महाआघाडी सरकारला टीकेचे लक्ष्य करीत महाराष्ट्र एक नंबरवर पोहोचला आहे, परंतु मुख्यमंत्र्यांमुळे नव्हे तर कोरोनामुळे असा टोला त्यांनी लगावला होता.