सचिन लुंगसे/पूजा दामले , मुंबईउमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून ते मतदान मोजणीपर्यंतची प्रक्रिया महापालिकेने डिजिटल केली आहे. उमेदवारी अर्जही आॅनलाइन भरून घेतले असून, आता दोन अॅप्लिकेशन तयार करण्यात आली आहेत. एका अॅप्लिकेशनच्या मदतीने मतदार राजा थेट आयोगाकडे गैरप्रकाराची तक्रार नोंदवू शकणार आहे. विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीही अद्ययावत करण्यात आली असून, मागील कित्येक महापालिका निवडणुकांच्या तुलनेत यंदाची मुंबई महापालिका निवडणूक डिजिटल ठरेल, असा आशावाद अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.बदलत्या काळानुसार आता निवडणूक प्रक्रियाही अद्ययावत करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे ‘ट्रू व्होटर’ नावाचे अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अॅप्लिकेशनमध्ये मतदाराला तक्रार नोंदवता येणार आहे. त्याचबरोबरीने ‘एसईसी व्होटर लिस्ट सर्च’, ‘सर्च इन सीईओ व्होटर लिस्ट’, ‘व्होटर लिस्ट आॅब्जेक्शन’ असे पर्याय देण्यात आले आहेत. याचबरोबरीने ‘सिटीझन आॅन पेट्रोल’ नावाचे एक अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. यामध्ये मतदार निवडणुकीच्या काळात चुकीच्या घडणाऱ्या घटना, आचारसंहितेचा भंग होत असेल, अशा ठिकाणांची माहिती फोटो, व्हिडीओद्वारे या अॅप्लिकेशनवर अपलोड करू शकतो. या अॅपवर माहिती अपलोड केल्यावर, तिथल्या ठिकाणचे माहिती अधिकारी त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. कोणत्याही भागात आचार संहितेचा भंग झाल्याचे आढळून आल्यास, महापालिका अधिकारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवू शकतात, असे संजय देशमुख यांनी सांगितले.उमेदवारांनी आॅनलाइन फॉर्म भरले असून, त्या फॉर्मची प्रिंट आउट काढून फॉर्म दाखल केला आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान होणार असून, मोजणीही इलेक्ट्रॉनिक मशिनच्या सहाय्याने होणार आहे. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच एक नियम लागू करण्यात आला आहे. यामध्ये उमेदवाराला पैसे खर्च करण्यासाठी एक बँक खाते काढायचे आहे. याच खात्यामधून उमेदवार निवडणुकीचा खर्च करू शकतो, असेही देशमुख यांनी सांगितले.पहिल्यांदाच केंद्र शासनाच्या खात्यातून अधिकारी तैनातराज्य शासनाकडून ११ अतिरिक्त कलेक्टर पोस्टचे अधिकारी, आयकर विभागाचे १५ अधिकारी, १५ सेल्स टॅक्स अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच केंद्र शासनाच्या खात्यातून अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.तीन वेळा प्रशिक्षणनिवडणुकीच्या कामासाठी निवड करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना तीनदा प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात मतदान केंद्रात वर्तन कसे असावे?, मतदान प्रक्रिया कशी असते?, बुथ कसे उभारावे?, मतदान यंत्राची जोडणी कशी करावी?, मतदान पेटी सील कशी करावी? अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. पहिल्यांदा प्रशिक्षण देऊन झाले असून, अजून दोनदा हे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे. रोज द्यावा लागणार हिशोब प्रत्येक उमेदवाराला १० लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा देण्यात आली आहे. प्रचार, सभांसाठी केला जाणारा खर्च उमेदवाराला रोजच्या रोज द्यावा लागणार आहे. आज दिवसभरात केलेला खर्च हा दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत रिटनिंग आॅफिसरकडे सादर करावा लागणार आहे. बैठकांचे सत्रमुंबई महापालिकेची निवडणूक प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध व्हावी, यासाठी आयुक्त अजय मेहता यांच्या स्तरावर विशेष बैठकांचे आयोजन केले जात आहे. मागील सहा महिन्यांपासून या बैठका सुरू असून, मागील आठवड्यात झालेल्या मासिक आढावा बैठकीत आयुक्तांनी निवडणूक कामांचा सविस्तर आढावा घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रत्यक्षात मतदान होण्यापासून मतमोजणी होईपर्यंत आयुक्त स्तरावरील बैठकांचे नियोजन करण्यात आले असून, या बैठकीद्वारे झालेल्या कामांच्या आढाव्यासह भविष्यातील कामांचा आढावा घेतला जाणार आहे.२४ विभागांत नियंत्रण कक्षविभाग कार्यालयात भरारी पथके, व्हिडीओ सर्वेलन्स पथके; तसेच व्हिडीओ व्ह्यूव्हिंग चमू कार्यरत राहणार आहेत. २४ विभाग कार्यालयांमध्ये २४ तास चालणारा नियंत्रण कक्षदेखील स्थापन करण्यात आला आहे.आज चिन्हवाटप८ फेब्रुवारी रोजी चिन्हवाटप होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी यांच्या विभागानुसार वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे. याअंतर्गत साधारणपणे ३ हजार ५०० पेक्षा अधिक वाहनांची व्यवस्था असणार आहे.आचारसंहितेच्या पालनासाठी पथकेआचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात १३ स्टॅटिक पथके, ९८ भरारी पथके; तर ३९ व्हिडीओ सर्वेलियन्स पथके यांचा समावेश आहे.
यंदाची निवडणूक डिजिटल!
By admin | Published: February 08, 2017 4:47 AM