Join us  

यंदाचा गणेशोत्सव पालिकेच्या नियमांप्रमाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:11 AM

मुंबई : महापालिकेने गणेशोत्सवासंदर्भात केलेल्या नियमांमुळे मंडळे काहीशी नाराज झाली असली तरी नियमावलीचे पालन करूनच गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा ...

मुंबई : महापालिकेने गणेशोत्सवासंदर्भात केलेल्या नियमांमुळे मंडळे काहीशी नाराज झाली असली तरी नियमावलीचे पालन करूनच गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्धार मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. समन्वय समितीने केलेली ही मागणी मान्य करण्यात आली, त्याबद्दल मंडळांनी समाधान व्यक्त केले.

उत्सवाच्या नियमावलीबद्दल मुंबईचा राजा मंडळाचे सचिव सचिन परब यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, यंदा पालिकेच्या नियमावलीनुसार गणेशोत्सव साजरा केला जाईल. बाप्पाचे ऑनलाइन दर्शन देण्याचा मंडळाचा विचार आहे. पालिकेने मंडळासाठी चार फूट उंचीची, तर घरगुती गणपतीसाठी दोन फुटांच्या मूर्तींना परवानगी दिली आहे. गणेशभक्त गौरव शिर्के हे दरवर्षी शाडूच्या गणपतीची मूर्ती घरी आणतात. पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्याकडे त्यांचा कल आहे. कोरोनाचे संकट गणेशोत्सवावर आहे. त्यामुळे उत्साह कमी आहे. पाहुण्यांची रेलचेल याही वेळी नसेल. तसेच, गणपती विसर्जन घरीच कृत्रिम तलावात करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

गणपती उत्सवादरम्यान गर्दी होणार नाही तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन व्हावे, अशी सूचना पालिकेने दिली आहे. शिवडीचा राजा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव म्हणाले की, पालिकेने ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे पालन होईल. विसर्जनासाठीही काळजी घेऊ. उत्सव साजरा करता येतो आहे, हाच आनंद मोठा आहे.