यंदाचा गणेशोत्सव मंडळांसाठी आव्हानात्मक होता - ॲड.नरेश दहिबांवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:07 AM2021-09-19T04:07:27+5:302021-09-19T04:07:27+5:30

मुंबई : गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने, सरकारने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. ...

This year's Ganeshotsav was challenging for the Mandals - Adv. Naresh Dahibaonkar | यंदाचा गणेशोत्सव मंडळांसाठी आव्हानात्मक होता - ॲड.नरेश दहिबांवकर

यंदाचा गणेशोत्सव मंडळांसाठी आव्हानात्मक होता - ॲड.नरेश दहिबांवकर

Next

मुंबई : गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने, सरकारने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. मंडळांनीही सरकारला सहकार्य करत, सर्व नियमांचे पालन केले. मात्र, नियमावली जाहीर करण्याच्या अगोदर सरकारने गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक न घेतल्याने, समन्वय समिती व मंडळांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. गणेशोत्सवाच्या तोंडावरही ऐन वेळी सरकारने काही निर्बंध घातल्यामुळे अनेक मंडळांचा हिरमोड झाला. यंदाचा गणेशोत्सव हा मंडळांसाठी आव्हानात्मक होता, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबांवकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

यंदाचा गणेशोत्सव कसा होता?

यंदाचा गणेशोत्सव हा समन्वय समितीच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक होता. शासनाने नियमावली जाहीर करण्याच्या आधी आमच्यासोबत बैठक घ्यावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मात्र, तसे झाले नाही, परंतु उत्सव गतवर्षीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा, अशी आमची इच्छा होती. तरीही आम्ही आमची नाराजी बाजूला ठेवून शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे ठरविले व यंदाचा उत्सव हा उत्साहात झाला. मंडळांनी नियमांचे तंतोतंत पालन केले.

यंदा सरकार व मंडळ यांच्यात खरंच समन्वय साधला गेला का?

गेली ४० वर्षे मी समन्वय समितीमध्ये कार्यरत आहे. यंदाच्या यंदा सरकारच्या नियमांमुळे मंडळांमध्ये संभ्रम निर्माण झाला, परंतु उत्सव साजरा करायचा असल्याने आम्ही ते सांभाळून घेतले. त्यानंतर, आम्ही समन्वय साधण्यासाठी प्रयत्न केला नाही. कारण उत्सव चांगल्या प्रकारे कसा साजरा करता येईल, याकडे आमचे लक्ष होते. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत उत्सव योग्य प्रकारे साजरा झाला. सरकारविषयी असलेली नाराजी बाजूला ठेवून आम्ही केवळ उत्सव साजरा करण्यावर भर दिला.

सरकारने ऐन वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे मंडळांना अडचणी आल्या का?

पहिली नियमावली जाहीर करतानाच सरकारने मंडळांना व समितीला विचारात घ्यायला हवे होते. दरवर्षी समन्वय समितीची व मंडळांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होते. यंदा ती न झाल्याने काहीशी नाराजी आहे. शहरातून दहशतवादी ताब्यात घेतल्याच्या बातम्या हल्ली कानावर येत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बैठक होणे गरजेचे होते, परंतु मागील काही दिवसांमध्ये आम्ही स्वतः मंडळांना भेटी देऊन अनोळखी व्यक्ती दिसल्यास सावध राहण्याचे आवाहन करत आहोत.

कोरोनाच्या काळातल्या गणेशोत्सवाने काय शिकविले?

कोरोनाच्या काळात गणेशोत्सव मंडळांच्या ४५० कार्यकर्त्यांनी रुग्णांची सेवा केली. आपल्या कुटुंबाचा विचार न करता कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ १० दिवसांचा उत्सव नसून, तो वर्षभर आरोग्य उत्सव म्हणून साजरा करता येऊ शकतो, हे आम्हाला या कोरोनाच्या काळातील गणेशोत्सवाने शिकविले.

Web Title: This year's Ganeshotsav was challenging for the Mandals - Adv. Naresh Dahibaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.