Join us

मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट !, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बोनसमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 6:47 PM

मुंबई महानगर पालिकेच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी कर्मचाऱ्यांना 14000 रुपये बोनस देण्यात आला होता.

मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे. दरवर्षी मिळणारी पाचशे रूपये वाढ झुगारून बंड पुकारणा-या कामगार संघटनांची 40 हजार रूपये बाेनसची मागणी पालिका आयुक्त अजाेय मेहता यांनी फेटाळली.  महापाैर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मध्यस्थी करून जादा पैसे मिळवून देणारच असे आव्हान प्रशासनाला दिले. मात्र आयुक्त आपल्या मतावर ठाम राहिल्याने शिवसेनेला अखेर नमते घ्यावे लागले. आणि पुन्हा पाचशे रुपयांची वाढ हातात टेकवून साडेचाैदा हजारांवरच पालिका कामगारांची बाेळवण करण्यात आली आहे. बेस्ट कामगारांच्या बाेनसचा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला आहे. 

दिवाळीला काही दिवस उरले तरी पालिका कर्मचार्‍यांच्या बोनससाठी वाटाघाटी सुरूच हाेती. गेली पाच वर्षे विना चर्चा पाचशे रूपये वाढवून बाेनस मिळत असल्याने कामगार संघटना एकत्र आल्या हाेत्या. या संघटनांनी माेर्चा काढून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. महापाैरांनीही यात हस्तक्षेप करीत कामगारांना जादा बाेनस मिळवून देणारच अशी घाेषणा केली हाेती. त्यामुळे बाेनसबाबत तिढा निर्माण हाेऊन बैठकांच्या फे-या सुरू झाल्या. मात्र यावर ताेडगा निघत नव्हता. 

नाेटबंदी तसेच जकात रद्द झाल्यामुळे महापालिकेचा माेठा महसूल बुडला आहे. त्यामुळे 40 हजार रूपये एवढी माेठी रक्कम देता येणार नाही,  अशी भूमिका आयुक्तांनी घेतली. यावर वाटाघाटीसाठी महापाैरांनी मंगळवारी बाेलाविलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत आयुक्त फिरकलेच नाहीत. परिणामी महापाैर व कामगार नेत्यांनाच माघार घ्यावी लागली. ही रक्कम स्वीकारण्यास कामगार संघटना राजी झाल्याने साडेचाैदा हजार रूपये बाेनसची घाेषणा महापाैरांनी केली. बेस्ट कामगारांच्या बाेनसबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. 

 

असा मिळणार बोनस 

पालिका कर्मचारी – १४ हजार ५०० रुपये 

अनुदानप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी – ७,२५० रुपये 

सामाजिक महिला आरोग्य स्वयंसेविका – ४२०० रुपये 

पालिकेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षण सेवक – ४५०० रुपये 

अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षण सेवक – २, २५० रुपये 

बोनसमुळे पालिकेच्या तिजोरीवर १६०.३० कोटींचा भार येणार आहे. 

दिवाळीपूर्वी कर्मचार्‍यांना खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. 

-पालिकेच्या एक लाख दहा हजार कर्मचा-यांना याचा ललाभ मिळणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकादिवाळी