राज चिंचणकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे औचित्य साधून, सरकार दरबारी काही ना काही मागण्या केल्या जात असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. परंतु, यंदा मुलुंड येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मात्र या अलिखित प्रथेला मूठमाती मिळण्याची चिन्हे आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनीच तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. यंदा नाट्य परिषदेचे काहीच ‘मागणे’ नाही, असे चित्र या नाट्य संमेलनात दिसण्याची शक्यता आहे.
नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शासनाकडे विविध मागण्या केल्या जातात. मात्र यंदाचे नाट्य संमेलन त्याला अपवाद असेल. सरकारकडून काहीही मागण्यासाठी आम्ही नाट्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर करणार नाही, असे वक्तव्य प्रसाद कांबळी यांनी नाट्य संमेलनाविषयीच्या पत्रकार परिषदेत केले आहे. त्याचप्रमाणे शासनाकडून यंदाच्या नाट्य संमेलनासाठी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, उर्वरित २५ लाखांचा निधी पुढील आठवड्यापर्यंत नाट्य परिषदेला मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, १३ ते १५ जून या कालावधीत होणाऱ्या या नाट्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. ‘कालिदास नाट्यगृह’ हा नाट्य संमेलनाचा मुख्य रंगमंच असेल. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन उभारण्यात आलेल्या ‘वॉटरप्रूफ’ मंडपाला ‘सुधा करमरकर रंगमंच’; खुल्या रंगमंचाला ‘डॉ. हेमू अधिकारी रंगमंच’;
तसेच जलतरण तलावानजीकच्या मंचाला ‘किशोरी आमोणकर रंगमंच’ असे संबोधण्यात येणार आहे.
रंगतदार कार्यक्रमांचा ‘प्रसाद’...
‘नॉनस्टॉप’ ६० तास (?) चालणाºया या नाट्य संमेलनात रसिकांना विविध कार्यक्रमांचा ‘प्रसाद’ मिळणार आहे. यात लोककला सादरीकरणावर अधिक भर देण्यात येणार आहे. नियोजित नाट्य संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या प्रकट मुलाखतीसह संगीतबारी, नृत्यनाटिका, एकांकिका, सांगीतिक सादरीकरण, ‘सांस्कृतिक आबादुबी’ अंतर्गत परिसंवाद आदी कार्यक्रमांचा समावेश या नाट्य संमेलनात असेल. या कार्यक्रमांची अंतिम रूपरेषा लवकरच ठरणार आहे.