Join us

कोरोनाच्या छायेत यंदाचा रक्षाबंधन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:08 AM

मुंबई : सण आणि उत्सवांनी भरलेल्या श्रावण महिन्यावर यंदादेखील कोरोनाचे सावट आहे. मात्र मागील वर्षापेक्षा यंदा कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात ...

मुंबई : सण आणि उत्सवांनी भरलेल्या श्रावण महिन्यावर यंदादेखील कोरोनाचे सावट आहे. मात्र मागील वर्षापेक्षा यंदा कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने यंदा श्रावण महिन्यातील सण उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. रविवारी भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याची, निरागस व पवित्र प्रेमाची आठवण करून देणारा रक्षाबंधन हा सण कोरोनाच्या छायेत साजरा करण्यात आला.

मागील वर्षी कोरोनाचे संकट गडद असल्याने अनेक कुटुंबांमध्ये भाऊ बहीण एकमेकांकडे न जाता त्यांनी घरच्या घरीच किंवा ऑनलाइन पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला. यंदा शहरात कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने व सरकारने निर्बंधांमध्येदेखील शिथिलता दिल्याने भाऊ बहिणींनी एकमेकांकडे जाऊन सण साजरा केला. यंदा कोरोनाचे सावट होते तरीदेखील रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला.

लोकल प्रवासावर निर्बंध असल्याने प्रवासासाठीदेखील बस, रिक्षा व कॅब यांचा पर्याय निवडण्यात आला. यामुळे रविवारी रस्त्यावर खासगी प्रवासी वाहनांची वर्दळ वाढली होती. रक्षाबंधनानिमित्त मुंबई अनेक ठिकाणी नारळ फोडण्याची स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. यंदाचा रक्षाबंधन साजरा करताना बहीण व भावांनी पुन्हा या जगावर कधी कोरोनासारख्या रोगाचे सावट न येवो. तसेच भाऊ बहिणीच्या नात्याप्रमाणे समाजातील सर्व व्यक्तींमधील बंधुभाव नेहमी वृद्धिंगत होत राहो, अशी मनोकामना व्यक्त केली.