दहावी, अकरावीच्या ३० टक्के, तर बारावीच्या ४० टक्के गुणांवर ठरणार बारावीचा यंदाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:06 AM2021-07-03T04:06:02+5:302021-07-03T04:06:02+5:30

राज्य शिक्षण मंडळाकडून बारावी निकालाच्या मूल्यमापनाचे निकष जाहीर; लवकरच निकालाच्या कार्यवाहीबाबत वेळापत्रकही जाहीर होणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई राज्य ...

This year's result of class XII will be based on 30% marks of 10th, 11th and 40% marks of 12th standard | दहावी, अकरावीच्या ३० टक्के, तर बारावीच्या ४० टक्के गुणांवर ठरणार बारावीचा यंदाचा निकाल

दहावी, अकरावीच्या ३० टक्के, तर बारावीच्या ४० टक्के गुणांवर ठरणार बारावीचा यंदाचा निकाल

Next

राज्य शिक्षण मंडळाकडून बारावी निकालाच्या मूल्यमापनाचे निकष जाहीर; लवकरच निकालाच्या कार्यवाहीबाबत वेळापत्रकही जाहीर होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचा तिढा अखेर सुटला असून मंडळाकडून निकालाच्या मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर झाले आहे. हे सूत्र सीबीएसई मंडळाच्या धोरणावरच अवलंबून आहे. यात दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्क्यांचा याचा अंतर्भाव असेल. दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्षातील गुणांचे ३०:३०:४० या सूत्रानुसार मूल्यमापन करून यंदाचा बारावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात येईल. दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाची कार्यवाही कशी आणि कधीपर्यंत करावी, याचे सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित घटकांशी चर्चा करून बारावीची मूल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाने तब्बल महिन्याभराने म्हणजेच शुक्रवारी जाहीर केली. बारावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मुख्याध्यापक आणि प्राचार्यांसह कमाल ७ सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. हा निकाल कनिष्ठ महाविद्यालयाने वर्षभर घेतलेल्या विषयनिहाय ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या वा तत्सम मूल्यमापनानुसार अवलंबून असणार आहे. यासाठी संगणक प्रणाली विकसित केली असून त्यानुसार आराखडा आणि मिळालेल्या गुणांचा ताळमेळ मंडळाकडून बसवला जाणार आहे. शाळांनी गुणांच्या अभिलेखांचे जतन करून ते आवश्यक त्यावेळी मंडळाला सादर करणे अपेक्षित असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

अंतर्गत मूल्यमापन झालेच नसल्यास

बारावीअंतर्गत मूल्यमापन करताना ज्या कनिष्ठ महाविद्यालयांनी तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत, तत्सम परीक्षा आयोजित केल्या नसतील त्यांनी ऑनलाइन किंवा अन्य शक्य त्या पर्यायी मूल्यमान पद्धती आयोजित करून गुणदान करावे, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत. उत्तीर्ण झाल्यानंतर शाखा बदलून अन्य शाखेत बदल केला असल्यास त्या विद्यार्थ्याला अकरावी व बारावीमधील समान विषयांची सरासरी विचारात घेऊन १०० पैकी गुण इतर विषयांना देण्याची कार्यवाही करावी, असे नमूद करण्यात आले आहे.

निकालाने असमाधानी असल्यास आणखी दोन संधी

ज्या विद्यार्थ्यांचे या कार्यपद्धतीने जाहीर केलेल्या निकालाने समाधान होणार नाही त्या विद्यार्थ्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाकडून प्रचलित पद्धतीनुसार घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये श्रेणीसुधार योजनेंतर्गत दोन संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पुनर्परीक्षा, खाजगीरीत्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा असा देणार निकाल

पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल हा त्यांच्या दहावी आणि बारावीच्या गुणांवर अवलंबून असणार आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना दहावीच्या मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ५० टक्के आणि यापूर्वी बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयातील लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांची सरासरी याला ५० टक्के असा एकूण निकाल तयार करण्यात येणार आहे.

खाजगीरीत्या बसलेल्या विद्यार्थ्यांसाठीही दहावी मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या विषयांचे सरासरी गुण ५० टक्के आणि बारावीतील चाचण्या, गृहकार्य, प्रकल्प, तत्सम अंतर्गत मूल्यमापनाचे गुण यांचे ५० टक्के ग्राह्य धरण्यात येणार आहेत. कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या (दिव्यांग विद्यार्थ्यांसहित) विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन, दूरध्वनीद्वारे किंवा इतर शक्य पर्यायांनी एकास एक वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून गुणदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: This year's result of class XII will be based on 30% marks of 10th, 11th and 40% marks of 12th standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.