यंदाची 'सवाई'.
यंदाची ‘सवाई’... केवळ आठवणींची..!
राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी एकांकिकांच्या विश्वात चतुरंग प्रतिष्ठानची ‘सवाई एकांकिका स्पर्धा’ महत्त्वाचे स्थान राखून आहे. जानेवारी महिना उजाडला की तमाम रंगकर्मींना ‘सवाई’चे वेध लागतात. दरवर्षी २५ जानेवारीच्या रात्री सुरू होणारी ‘सवाई’, २६ जानेवारीच्या पहाटेपर्यंत चालते, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. यंदा मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही ‘सवाई’ केवळ आठवणींमध्ये रंगणार आहे.
राज्यभरात अनेक संस्थांतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध एकांकिका स्पर्धांतून प्रथम आलेल्या एकांकिकांना ‘सवाई’मध्ये एन्ट्री असते. साहजिकच, या स्पर्धेची प्रचंड उत्सुकता रंगकर्मींमध्ये असते. मात्र गेले वर्ष कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने, एकांकिका स्पर्धांवर पडदा पडला. त्याचे पडसाद यंदाच्या ‘सवाई’वर उमटणे अपेक्षितच होते. परंतु, ‘सवाई’ची परंपरा कायम राखण्याच्या हेतूने, यंदा ‘सवाई’च्या कार्यकर्त्यांनी ‘आठवणींची सवाई’ सादर करण्याचा घाट घातला आहे. या अंतर्गत, ‘नॉस्टॅल्जिक सवाई’ असा ऑनलाइन उपक्रम यंदा राबवला जाणार आहे. यात सवाई एकांकिका स्पर्धेच्या आतापर्यंतच्या प्रवासातील काही महत्त्वाचे टप्पे अनुभवता येणार आहेत. २५ जानेवारीच्या रात्री १० वाजल्यापासून ‘सवाई’च्या आठवणींचा जागर करण्यात येणार आहे.