Join us

यंदाच्या दहावीला नववीच्या गुणांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:06 AM

सरल प्रणालीत नोंदविलेल्या माहितीनुसार मिळणार ५० टक्के गुणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या दहावीच्या मूल्यमापन ...

सरल प्रणालीत नोंदविलेल्या माहितीनुसार मिळणार ५० टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार ५० टक्के अंतर्गत मूल्यांकनासाठी त्यांच्या मागील वर्षीच्या म्हणजेच नववीच्या अंतिम निकालाचा आधार घेतला जाईल. सरल प्रणालीत नोंदविलेल्या माहितीनुसार ५० टक्के गुण दिले जातील.

यंदा दहावीची परीक्षा देणे अपेक्षित असलेल्या आणि शैक्षणिक वर्ष २०१९-२० ला नववीची परीक्षा दिलेल्या राज्यातील १९ लाख ३४ हजार ९४ विद्यार्थ्यांची माहिती सरळ प्रणालीत नोंद केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. २०१९-२० ला नववीला असलेल्या या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ९४.६९ टक्के म्हणजेच १८ लाख ३१ हजार ३४४ विद्यार्थी राज्यात उत्तीर्ण होते. त्यापैकी केवळ १.२४ टक्के म्हणजेच जवळपास २८ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर ४ टक्के म्हणजे ७८ हजार विद्यार्थ्यांच्या माहितीची नोंद सरल प्रणालीत नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय १०० गुणांनुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येईल. गेल्या म्हणजेच २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस काेरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. मात्र, त्यापूर्वी नववीच्या विद्यार्थ्यांची दोन चाचणी परीक्षा आणि सहामाही परीक्षा झाली होती. त्याआधारे नववीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून, त्याची नोंद सरल प्रणालीत आहे. यापैकी ५० टक्के गुण यंदाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरण्यात येतील. सर्व राज्यातील पालघर, ठाणे आणि मुंबई पालिका विभाग वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील २०१९-२० वर्षाचा नववीचा निकाल हा ९० टक्क्यांच्या वर असल्याचे दिसून आले आहे. या ३ जिल्ह्यांचा निकालही ८५ टक्क्यांहून अधिकच आहे. त्यामुळे दहावीच्या यंदाचा निकाल विद्यार्थ्यांना त्यांच्या नववीच्या शैक्षणिक कामगिरीवर आधारित असाच असल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचे स्वागतच होत आहे.

* हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान

नववीच्या विद्यार्थ्यांच्या घटक चाचण्या आणि एक सराव परीक्षा होऊ शकल्याने त्यांना त्यावेळी सरासरीच्या आधारावर गुणदान करून अंतिम निकाल देण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील नववीच्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण सरासरी ९२ ते ९५ टक्क्यांच्यावर आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यंदा दहावीच्या परीक्षांसाठी अभ्यास केला नाही, ते विद्यार्थीही नववीतील ५० टक्के गुणांच्या आधारावर सरासरी विद्यार्थ्यांच्याच जवळची पातळी गाठतील. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता मोजली जाताना हुशार विद्यार्थ्यांचे निश्चित नुकसान होणार असल्याचे मत शिक्षक, मुख्याध्यापक व्यक्त करीत आहेत. न्यायालयाच्या निर्णयांनंतरच या गुंतागुंतीच्या निर्णयात आणखी स्पष्टता येणार असल्याने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका त्यांनी स्वीकारली आहे.

* काही महत्त्वाच्या जिल्ह्यांतील नववीच्या मूल्यमापनाची आकडेवारी (२०१९-२०)

जिल्हा - विद्यार्थीसंख्या - उत्तीर्णतेचे प्रमाण (टक्क्यांमध्ये) - अनुत्तीर्ण

पुणे- १,६५,२७२- ९०. ६५ - २.४ ८

मुंबई (पालिका) - १८,४२४- ८६.०२- ६. ५९

मुंबई (डीव्हायडी) - १,५६,८२९- ९३ - २.८५

औरंगाबाद - ७७,९५३- ९४.६८- ०.३१

नाशिक - १,११,२३९-९६.३५ - ०.८१

नागपूर- ७६,६२१- ९४. ८६ - १. १७

लातूर - ५०,९७४- ९६. ७४ - ०. ५३

कोल्हापूर- ६४,२४५- ९६. ५५- ०. ४५

ठाणे- १,४३,६८६- ८८. २० - ३. ०३

अहमदनगर - ८२,२५४ - ९६ . २- ०. ६७

...............................................................................