मुंबई : थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन म्हणजे मजा-मस्ती, धांगडधिंगा आणि सगळीकडे पार्टीचा मूड. नववर्षाचे मध्यरात्री स्वागत करण्यासाठी मुंबईत दरवर्षी तरुणाई निरनिराळे प्लॅन करत असते. मात्र यंदा वर्षअखेरीस मुंबईत कोरोना पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. हेच लक्षात घेता थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशन वर पोलिसांची करडी नजर आहे.
कोरोनाच्या संसर्गास आपण जबाबदार ठरू नये यासाठी मुंबईकरांनी यंदाचा थर्टी फर्स्ट साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठमोठ्या पार्ट्या रद्द झाल्याने आता घरच्या घरी कमी माणसांच्या उपस्थित नववर्षाचे स्वागत मुंबईकर करणार आहेत. मुंबईतील मरीन ड्राईव्ह, सी फेस, गेटवे ऑफ इंडिया येथील नववर्षाचे स्वागत पाहण्यासाठी दरवर्षी परराज्यातून देखील अनेक नागरिक मुंबईत येतात. मात्र यंदा नाताळच्या आधीपासूनच मुंबईत रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे इतर राज्यातील नागरिकांनी तसेच अनेक मुंबईकरांनी देखील मुंबई बाहेरची वाट धरली आहे.
मुंबईतील रेस्टॉरंट देखील ५० टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याचे आदेश असल्याने यंदा थर्टी फर्स्ट निमित्त होणाऱ्या व्यवसायात रेस्टॉरंट चालकांना ३० टक्के नुकसान सहन करावे लागणार आहे. पोलिसांनीही ठिकठिकाणी गस्त वाढविली आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई होत आहे.
वरळीत ड्रग्स माफियांना विरोध करत होणार स्वागतवरळी नाका येथील गोपचार बिल्डिंगमधील रहिवाशांनी यंदा इमारतीच्या आवारात ड्रग्स माफियाची प्रतिकृती बनवली आहे. ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता त्याचे दहन केले जाणार आहे. सलग २९ वर्षे या इमारतीमधील रहिवाशी वास्तवदर्शी संकल्पना सादर करून नववर्षाचे स्वागत करतात. मात्र यंदा नववर्षाचे स्वागत साधेपणाने व ड्रग्स माफियांना विरोध करून केले जाणार आहे.
थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही यंदा मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. मात्र सरकारने घातलेले निर्बंध तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पार्टीचा बेत रद्द केला. सर्व मुंबईकरांनी थर्टी फर्स्ट साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन आम्ही सर्व मित्र समाज माध्यमातून करत आहोत.- सौरभ गावडे, कॉलेज विद्यार्थी