मुंबई - ठाणे महापालिकेतील नगरसेवक विक्रांत चव्हाण पुन्हा वादात सापडले आहे. नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी महिला पत्रकाराशी गैरवर्तन करत असल्याचा व्हिडीओ सध्या वायरल झाला असून तो वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. कुर्ला येथे नुकतीच नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना शिवीगाळ, धमकी देत मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. त्यातच आज पुन्हा ठाण्याच्या नगरसेवकाची महिला पत्रकारासोबत अरेरावी करतानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे. विक्रांत चव्हाण यांनी 'ए, तू शानी बन' असं अर्वाच्च भाषेत बोलून पत्रकाराच्या हातातील मोबाईल झिडकारलं असल्याची वायरल व्हिडिओत दिसत आहे. घाटकोपरमेट्रो स्थानकावर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
हात-पाय कापून टाकू अशी धमकी देत कप्तान मलिक यांची कामगारांना मारहाण
विक्रांत चव्हाण यांनी एका महिला पत्रकारावर तिचा मोबाईल झिडकारून तिला अपमानास्पद वागणूक दिली. महिला पत्रकाराने नगरसेवक विक्रांत चव्हाण यांची दादागिरी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत उघडकीस आणली आहे. बुधवारी दुपारी महिला पत्रकार घाटकोपरमेट्रो रेल्वे स्थानकावरून कामावर जाण्याकरिता निघाली होती. स्थानकावर कर्मचाऱ्यांवर एक व्यक्ती जोरजोरात ओरडत होती. त्यानंतर महिला पत्रकारानं तिकडे धाव घेऊन काय प्रकार झाला याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महिला अधिक जवळ गेल्यानंतर तो व्यक्ती जोर जोरात ओरडत मी नगरसेवक विक्रांत चव्हाण असल्याचं सांगत अतिशय वाईट पद्धतीनं नगरसेवक हे मेट्रो रेल्वे कर्मचाऱ्यांशी बोलत असल्याने महिला पत्रकाराने त्याचा व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उलट नगरसेवकाने महिला पत्रकाराला “तू जा में विक्रांत चव्हाण हू काॅर्पोरेटर” असं सांगून आरडाओरड केला.
नेमकं काय घडलं मेट्रो स्थानकावर ?याबाबत आपली बाजू मांडताना नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की, घाटकोपर मेट्रो स्थानकावरून अंधेरी येथील वर्सोवा येथे मी माझ्या कुटुंबियांसह ट्रॅफिक असल्याने जाण्याचे ठरविले. काल आम्ही धीरुभाई अंबानी रुग्णालयात एकाच्या तब्येतीची विचारपूस करण्यात निघालो होतो. त्यावेळी मी वर्सोवा येथून परतत असताना घाटकोपर मेट्रो स्थानकावर मेट्रोकडून देण्यात येणार कॉईन अडकला. याबाबत मी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी माझ्याकडे रिटर्न तिकीट आहे का विचारले, त्यावर मी ते दिले आणि त्यांना मी नगरसेवक असल्याने तुम्ही माझ्याशी असे वागलात, सर्वसामान्य लोकांशी कसे वागलं? असा जाब विचारला. सर्वसामान्यांसाठी मदत कक्ष असायला पाहिजे असे देखील मी बोललो. त्यावेळी एक मुलगी माझ्यामागून येऊन माझा व्हिडीओ शूट करायला लागली.
मी तिला चार वेळा मॅडम, डोन्ट फॉलोव्ह मी, डोन्ट शूट माय व्हिडीओ अशी विनंती केली. तरीदेखील त्या तरुणीने माझ्या चेहऱ्यावर मोबाईल आणून माझा व्हिडीओ शूट केला. व्हिडीओ शूट करत असताना मी चाल शानी बन असं बोलून मी मोबाईल झिडकारला. पण माझा व्हिडीओ शूट करण्याचा अधिकार तिला कोणी दिला. इंटरवलनंतर चित्रपट पाहून चित्रपट खराब आहे असं बोलणं चुकीचं आहे. त्यासाठी पूर्ण चित्रपट पाहणं गरजेचं आहे. या तरुणीने व्हिडीओ एडिट करून इंस्टाग्रामवर टाकला आहे. माझी छबी खराब करण्याचा तिने प्रयत्न केला आहे. असंसदीय शब्द वापरण्यात आले आहेत. त्याविरोधात मी आयपीएस ४९९ अन्वये गुन्हा दाखल करणार आहे. माझा व्हिडीओ शूट करायचा अधिकार तिला कोणी दिला असं देखील चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.