- सचिन लुंगसे मुंबई : घामाजलेल्या शरीराने सिमेंट काँक्रीटचे रस्ते तुडविणाऱ्या मुंबईकरांनी चातकासारखी मान्सूनची वाट पाहिली आणि तो वाऱ्याच्या वेगाने मुंबईसह महाराष्ट्रात दाखलही झाला. काळ्याकुट्ट ढगांचा फौजफाटा घेऊन आलेल्या या वरुणराजाने पहाटेसह सांजवेळी समुद्राच्या क्षितिजावर काही काळ का होईना वर्दीही दिली. मात्र आजही तो हवा तसा बरसलेला नाही. काळ्या भुईला तर एव्हाना पालवी फुटणे अपेक्षित असताना तिला साधा ओलावाही गवसलेला नाही. रविवारी मान्सूनने राज्य आपल्या आसमंतखाली घेतले असतानाच येणाऱ्या अंदाजावर आजही बळीराजा आशा ठेवून बसला आहे. मात्र मान्सून काही बरसण्याचे नाव घेत नसल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १ ते १९ जूनपर्यंत पडलेला पाऊसही उणेच असून, तहान भागविण्यासाठी अवघ्या महाराष्ट्राची मदार आता हवामान खात्याच्या जुलैकडील अंदाजावर असल्याचे चित्र आहे.
मान्सून रेंगाळला होता; कारण... समुद्रात नैऋत्येकडून भारतीय भू -भागावर वाहणाऱ्या आर्द्रयुक्त वाऱ्याचा अभाव. मान्सून झेपावण्याच्या कालावधीत ईशान्य अरबी व बंगालच्या समुद्रावर अधिक उंचीचे कमी दाब क्षेत्राच्या तसेच चक्रीय वाऱ्याच्या प्रणाली निर्मितीचा अभाव. देशाच्या भू -भागावर पूर्व-मोसमी पावसाचा अभाव.
-५६% आजवर राज्यभरात झालेला पाऊस उणे ५६ टक्के आहे. राज्यात आजवर पुरेसा पाऊस झालेला नाही. जून व जुलै या महिन्यात वीज पडून जीवित हानी होते. जीवितहानी होऊ नये यासाठी नागरिकांनी व विशेषत: शेतकऱ्यांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी दामिनी ॲप अवश्य वापरावे. दामिनी ॲप वीज पडण्याची पूर्वसूचना देते.मुंबईकर तहानलेला मुंबई शहरात उणे ५४ टक्के पावसाची नोंद झाली. येथे सरासरी १८२.९ मिमी अपेक्षित असून, प्रत्यक्षात ८३.५ मिमी पाऊस पडला. मुंबईच्या उपनगरात देखील उणे ५४ टक्के पावसाची नोंद झाली. १७९.६ मिमी अपेक्षित असताना ८२.६ पाऊस पडला आहे.दक्षिण कोकणात सोमवारपासून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग