Join us  

राज्यभरात पावसाचं चांगभलं; चार दिवस कोसळधार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 9:25 AM

मुंबईला यलो, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला रेड अलर्ट

मुंबई : मुंबईसह राज्यभरात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवसांचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, रविवारसाठी मुंबईसह पालघरला यलो अलर्ट, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा व कोल्हापूर जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे आणि नवी मुंबई व लगतच्या परिसराला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार, शनिवारी मुंबईत दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्या असून, रविवारीदेखील अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण व घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

कोणत्या दिवशी कोणते अलर्ट?

रविवार यलो - मुंबई, पालघरऑरेंज - ठाणे, रायगड, पुणेरेड - सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी

सोमवारऑरेंज - मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी

मंगळवारऑरेंज - पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर

बुधवारऑरेंज - रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर

रविवारपासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. अरबी समुद्रातील ‘ऑफ शोर ट्रफ’ मजबूत आहे; त्याची ऊर्जा मुंबईसह कोकणात व सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील पावसासाठीच खर्ची होत आहे. धरण क्षेत्रात धिम्या गतीने सातत्य आहे. दक्षिणेकडील राज्यात वाढणारा अधिक पावसाचा जोर, तेथील पावसाच्या तीव्रता पाहता, महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ 

टॅग्स :मुंबईपाऊस