कूपर रुग्णालयात मिळणार यल्लो फिवरची लस
By संतोष आंधळे | Published: October 28, 2023 11:49 PM2023-10-28T23:49:24+5:302023-10-28T23:50:25+5:30
Mumbai News: महाराष्ट्रातूनही प्रतिवर्षी आफ्रिकन देशांमध्ये जाणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता,महानगरपालिकेच्या विलेपार्ले येथील नरसी कूपर रुग्णालयामध्ये पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सोमवार पासून सुरू करण्यात येत आहे.
मुंबई : आफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांना पिवळ्या तापाची लागण होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या नियमानुसार पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक असते. महाराष्ट्रातूनही प्रतिवर्षी आफ्रिकन देशांमध्ये जाणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता,महानगरपालिकेच्या विलेपार्ले येथील नरसी कूपर रुग्णालयामध्ये पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सोमवार पासून सुरू करण्यात येत आहे.
मुंबई विमानतळाचे आरोग्य अधिकारी डॉ. अच्छेलाल पासी यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरण केंद्राचे लोकार्पण सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.कूपर रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभाग अंतर्गत सदर लसीकरण केंद्र सुरु असणार आहे. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत या केंद्रात लस उपलब्ध असेल. त्यासाठी ३०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. लसीकरणासाठी येताना पासपोर्ट सोबत असणे गरजेचे राहील, अशी माहिती कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली आहे.
आफ्रिकन देशांमध्ये पिवळा ताप हा गंभीर आजार मोठय़ा प्रमाणावर आढळतो. या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या इतरही नागरिकांना पिवळ्या तापाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आफ्रिकन देशात जाणाऱ्या प्रत्येक विदेशी पर्यटकाला या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस देणे अत्यावश्यक आहे. या लसीमुळे संबंधित पर्यटक आफ्रिकन देशातून आपल्या देशात परतल्यानंतर त्यांच्या मूळ देशात आजार पसरत नाही. जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषानुसार व पिवळ्या तापाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक प्रवाशाला आफ्रिकन देशात जाण्यापूर्वी पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस द्यावी लागते.