Join us

Yes Bank: १५ कंपन्यांनी बुडविले येस बँकेचे ६0 हजार कोटी; संबंधितांची चौकशी शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 4:02 AM

येस बँकेवर गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत, तसेच बँकेचे संस्थापक व माजी अध्यक्ष राणा कपूर व त्यांच्या कुटुंबातील काहींना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

नवी दिल्ली : देशातील १५ उद्योग समूहांनी येस बँकेचे सुमारे ६० हजार कोटी बुडविले असल्याचे भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी म्हटले असून, १० कर्जबुडव्या कंपन्यांची नावे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केली. त्यात अनिल अंबानी ग्रुप, आयएल अँड एफएस, झीचे प्रमुख सुभाषचंद्र यांचा एस्सेल ग्रुप, डीएचएफएल, जेट एअर, कॉक्स अँड किंग्स, बी. एम. खेतान ग्रुप, ओंकार रिअ‍ॅल्टर आदींचा समावेश आहे.

येस बँकेवर गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत, तसेच बँकेचे संस्थापक व माजी अध्यक्ष राणा कपूर व त्यांच्या कुटुंबातील काहींना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. राणा कपूर यांच्या व त्यांच्या नातेवाइकांच्या नावे प्रचंड मालमत्ता आहे. त्याचीही तपासणी सुरू आहे. ज्या कंपन्यांना येस बँकेने कर्जे दिली, त्यापैकी काहींनी राणा कपूर यांच्या खात्यात काही रकमा जमा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या पत्नी व मुली अनेक कंपन्यांत संचालकपदी आहेत. राणा कपूर यांची ईडीमार्फत चौकशी सुरू असून, त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदविला आहे.ते चित्र दोन कोटींनाराणा कपूर यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काढलेले एक चित्र काही वर्षांपूर्वी विकत घेतले होते. त्या चित्रासाठी त्यांनी दोन कोटी रुपये मोजल्याचे सांगण्यात येते. त्या चित्राची किंमत खरोखर दोन कोटी रुपये असू शकते का आणि प्रियांका गांधी इतक्या ख्यातनाम चित्रकार आहेत का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

टॅग्स :येस बँककिरीट सोमय्या