येस बँकेत विद्यापीठाच्या १४२ कोटींच्या ठेवी!; विद्यापीठाकडून फॅक्ट फाइंडिंग कमिटी स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 02:27 AM2020-03-14T02:27:54+5:302020-03-14T02:28:17+5:30
दरम्यान, मुंबई विद्यापीठाची सध्या कार्यरत असलेली वित्त समिती बरखास्त करावी, अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे तब्बल १४२ कोटी रुपये हे आरबीआयने निर्बंध लादलेल्या येस बँकेमध्ये विद्यापीठाने फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी अधिसभा बैठकीत उघडकीस आला.
विद्यापीठाच्या ठेवी, निधी यासंदर्भातील गुंतवणूक कुठे आणि कशी करावी यासाठी विद्यापीठाची स्वत:ची अशी मार्गदर्शन करणारी स्वतंत्र गुंतवणूक समिती नाही, हा मुद्दा चर्चिला जात असताना अधिसभा सदस्य सुप्रिया कारंडे यांनी विद्यापीठाच्या १४२ कोटींच्या येस बँकेमधील गुंतवणुकीसंदर्भात प्रश्न विचारून हा विषय उजेडात आणला.
आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर एवढी मोठी रक्कम या बँकेमध्ये गुंतविण्याचा निर्णय कोणाचा आणि का? याची चौकशी करण्यासाठी तसेच विद्यापीठाचे वित्तीय धोरण, गुंतवणूक, विनियोग याबाबत विद्यापीठास मार्गदर्शन आणि सल्ला मिळावा व तंत्रज्ञानाचा अधिकाधिकवापर करून पारदर्शकता आणण्यासाठी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडून फॅक्ट फाइंडिंग कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या तब्बल ६९७ कोटींच्या ठेवींची गुंतवणूक किती बँकांमध्ये, कुठे आणि कोणत्या स्वरूपात आहे याची माहितीही विद्यापीठ प्रशासनाने अधिसभा सदस्यांना द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दरम्यान, मुंबई विद्यापीठाची सध्या कार्यरत असलेली वित्त समिती बरखास्त करावी, अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून करण्यात आली आहे.