अनिल अंबानींना ईडीची नोटीस; येस बँकेच्या राणा कपूरशी जोडले तार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 09:58 AM2020-03-16T09:58:28+5:302020-03-16T11:08:07+5:30
राणावर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्याच्या मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
नवी दिल्ली : येस बँकेच्या अधपतनाला कारणीभूत असलेल्या संस्थापक संचालक राणा कपूरला ईडीने ताब्यात घेतले आहे. या बँकेद्वारे मोठमोठी कर्जे वाटण्यात आली. ही जवळपास 30 हजार कोटींची कर्ज बुडीत खात्यात गेली असून यामध्ये अनिल अंबानींचेही नाव आहे.
राणावर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्याच्या मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. राणा कपूर गेल्या रविवारपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात असून सोमवार (दि. १६) कोठडीची मुदत आहे. रिझर्व्ह बॅँकने येस बॅँकेवर निर्बंध आणल्यानंतर ईडीने ६ मार्चला राणा कपूर याच्या वरळीतील समुद्र महल येथील फ्लॅट व कार्यालयावर छापे टाकले होते. त्याच्याकडे जवळपास ३० तासाच्या चौकशीनंतर गेल्या रविवारी पहाटे ईडीने अटक केली आहे. त्यानंतर सीबीआयनेही धाड सत्र घातले. त्यांच्या तीनही मुलींकडे कसून चौकशी सुरु असून देश सोडून न जाण्याबाबत ‘लुक आऊट’ नोटीस जारी केली आहे.
तसेच आज रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनाही ईडीने नोटीस पाठविली असून त्यांना राणा कपूर आणि अन्य लोकांनी केलेल्या पैशांच्या अफरातफरीशी संबंधित प्रकरणात चौकशीला बोलविण्यात आले आहे.
Reliance Group Chairman Anil Ambani summoned by ED in connection with its money laundering probe against Yes Bank promoter Rana Kapoor and others: officials
— Press Trust of India (@PTI_News) March 16, 2020
दरम्य़ान, आर्थिक अडचणीत आलेल्या येस बँकेत जादा भांडवल घालून व नवे संचालक मंडळ नेमून बँकेचे पुनरुज्जीवन करण्याच्या रिझर्व्ह बँकेने प्रस्तावित केलेल्या योजनेस केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने या बँकेवर लादलेले निर्बंध येत्या बुधवारच्या संध्याकाळपासून उठविले जातील. त्यामुळे खात्यांतून पैसे काढण्यावर घातलेली कमाल ५० हजार रुपयांची मर्यादा लागू असणार नाही.
घरीच बसा, जुनी कार विका; मारुती सुझुकीने आणली योजना
काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये कोरोनाची लक्षणे; जयपूरहून आलेल्या आमदाराचा खुलासा