मुंबई - येस बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केलेले बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष सुट्टीकालीन न्यायालयाने राणा कपूर यांना ११ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.
रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) शनिवारी कसून चौकशी करण्यात आली. सुमारे २० तास चाललेल्या चौकशीत बॅँकेची बेकायदेशीर कर्ज प्रकरणे, बेनामी व्यवहार याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. चौकशी केल्यानंतर पहाटे ४ च्या सुमारास कपूर यांना अटक करण्यात आली होती.
कपूर यांच्या वरळीच्या समुद्र महाल टॉवरमधील निवासस्थानी व परळ कार्यालयावर छापेमारी सुरू होती. कपूर यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे. बँकेचे दस्ताऐवज, मोठे कर्जदार व बॅँकेशी व्यवहार करणाऱ्या कंपन्यांसंबंधीचा दस्ताऐवज ईडीने जप्त केल्याचे सांगण्यात आले. येस बॅँकेच्या आर्थिक नुकसानीला राणा कपूर जबाबदार असल्याचे ईडीच्या चौकशीतून समोर आले आहे. मनमानीपणे कर्जवाटप, वसुलीसाठी नियमबाह्य झुकते माप दिल्याचे व्यवहारांतून स्पष्ट झाले आहे. अनिल अंबानी ग्रुप, आयएल अँड एफएस, सीजी पॉवर, एस्सार पॉवर, रेडियस डेव्हलपर्स आणि मंत्री ग्रुप आदी कंपन्यांना शेकडो कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोप आहे. तीन वर्षांपूर्वी बॅँकेने ६,३५५ कोटींचे कर्ज ‘बॅड लोन’मध्ये वर्ग केले. त्याच्या वसुलीसाठी प्रयत्न केले नसल्याचा ठपका कपूर यांच्यावर असल्याचे समजते.
संबंधित बातम्या
Yes Bank: काय सांगता? CEO राणा कपूरने प्रियंका गांधींचे पेंटीग्स 2 कोटी रुपयांना घेतले