मुंबई : सुमारे ३० तासांच्या सखोल चौकशीनंतर येस बॅँकेचे संस्थापक व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूरला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी पहाटे अटक केली. आर्थिक गैरव्यवहार (मनिलॉण्ड्रिंग), बेकायदा आणि अनियमित कर्जवाटप केल्याप्रकरणाचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे़ न्यायालयाने त्याला तीन दिवसांची ईडी कोठडी ठोठावली आहे.
बॅँकेच्या आर्थिक गैरव्यवहारात त्याची पत्नी आणि तीनही मुलींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यांच्यावरही कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. ईडीने शुक्रवार रात्रीपासून राणा कपूर याचे वरळीतील समुद्र महाल टॉवरमधील फ्लॅट, दिल्लीतील मुलींचे फ्लॅट आणि परळ येथील कार्यालयांवर छापे मारून झडती घेतली होती. त्यातून बॅँकेचा गैरकारभार आणि बेकायदा कर्जासंबंधी अनेक महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले. छापेमारीबरोबरच अधिकाऱ्यांच्या एका पथकाकडून राणा कपूर याच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत होती. विविध ३ टप्प्यात त्याच्याकडे सुमारे ३० तास प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. बॅँकेचे गैरव्यवहार, डीएचएलएफसह ठरावीक कंपन्यांना दिलेली हजारो कोटींच्या कर्जांना तोच कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पहाटे सहाच्या सुमारास त्याला अटक करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कपूरला अटक केल्यानंतर त्याची जीटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास सुट्टीकालीन न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. बॅँकेच्या हजारो कोटींची फसवणूक, कर्जवाटपातील अनियमितता याप्रकरणाला राणा कारणीभूत आहे. तो तपासाला सहकार्य करत नाही़ त्याची कोठडी देण्याची मागणी ईडीने न्यायालयात केली. कपूरच्या वकिलाने त्यावर आक्षेप घेतला. ते तपासाला पूर्ण सहकार्य करीत असून आतापर्यंत ईडीच्या सात कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्या आहेत. विविध विकार असल्यामुळे त्यांना ईडी कोठडी देऊ नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयात केली़ न्यायालयाने ती फेटाळून लावली व राणाला ११ मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कपूरने प्रामुख्याने काही वित्त तंत्रज्ञानाविरुद्ध (अॅपआधारित पेमेंट) कंपन्यांना नियमबाह्य कर्ज दिले, त्यासाठी विदेशी चलन वापरले, ही कर्जे थकीत झाली. त्याचप्रमाणे डीएचएफएललादेखील कर्ज दिले होते. त्याची परतफेड करण्यात आली. कपूरने त्याबदल्यात परदेशातील बॅँकेमध्ये आपल्या खात्यात हजारो कोटी वळते करून घेतले. कपिल वाधवानला दिलेल्या कर्जपुरवठ्यानंतर त्याने मृत गॅगस्टर इक्बाल मिर्चीची मालमत्ता विक्रीच्या व्यवहारातही गुंतवली होती. त्याबाबत राणा कपूरकडे सखोल चौकशी करण्यात येईल, असे अधिकाºयांनी स्पष्ट केले.
कपूरच्या मुलींच्या फ्लॅटवरही छापेराणा कपूर बरोबर त्याची पत्नी बिंदू कपूर आणि तीन मुलींकडेही कसून चौकशी सुरू आहे. मुली राखी कपूर-टंडन, रोशनी कपूर व राधा कपूर यांच्या मुंबई, तसेच दिल्लीतील घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. येस बँक, डीएचएफएल, राणा कपूर, त्यांच्या कन्या, कपिल वाधवान व गॅगस्टर इक्बाल मिर्चीची मालमत्ता यांचा परस्पराशी संबंध असल्याचे स्पष्ट होत असून कपूरची पत्नी व मुलीवर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.