Join us

Yes Bank: राणा कपूरच्या कोठडीत १६ तारखेपर्यंत वाढ; कुटुंबीयांत पैसे फिरवल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 1:50 AM

कार्यकाळात ३० हजार कोटींचे कर्ज मंजूर

मुंबई : मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेत असलेले येस बँकेचा संस्थापक राणा कपूर (६२) याच्या कोठडीत बुधवारी १६ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

कपूर गेल्या वर्षी जानेवारीपर्यंत येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या कार्यकाळात वेगवेगळ्या संस्थांना तब्बल ३० हजार कोटींचे कर्ज मंजूर केले होते. कुटुंबातील सदस्यांच्या नावाने थाटलेल्या संस्थांना हे कर्ज देण्यात आल्याचा संशय अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार, ईडीकडून अधिक तपास सुरू आहे.कपूर यांना रविवारी अटक करण्यात आली. ११ मार्चपर्यंत कोठडीत असलेल्या कपूर यांना वाढीव कोठडीसाठी बुधवारी विशेष सत्र न्यायालयातील न्यायाधीश पी.पी. राजवैद्य यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी आतापर्यंतच्या चौकशीतून समोर आलेली कागदपत्रे, पुरावे ईडीकडून न्यायालयात सादर करण्यात आले. ईडीच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, कपूर यांच्या कार्यकाळात ३० हजार कोटींचे कर्ज मंजूर झाले होते. यापैकी २० हजार कोटींची कर्ज दिलेली खाती बुडीत असल्याचे त्याने घोषित केले होते. कपूर यांच्या कुटुंबीयांमधील सदस्यांच्या नावावर ७८ कंपन्या आहेत. या बुडीत खात्यांमध्ये या कंपन्यांचा समावेश असल्याचा संशय ईडीकडून वर्तविण्यात आला, तसेच अन्य १० हजार कोटी कुठे आहेत? त्याचे काय केले? याबाबतही त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याने, त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती ईडीकडून करण्यात आली. त्यानुसार, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत १६ तारखेपर्यंत वाढ केली आहे.ईडीकडून सखोल तपास सुरूकर्ज मंजूर झालेल्या संस्थांकडे अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. शिवाय, कपूर यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांच्या मालमत्तेचा लेखाजोखाही तपासण्यात येत असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :येस बँक