Yes Bank : अंबानींच्या बाजूलाच राणा कपूरचा राजवाडा; देशातील 10 महागड्या घरांमध्ये समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:16 PM2020-03-09T15:16:44+5:302020-03-09T15:20:50+5:30
मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या अँटिलियाशेजारी राणा कपूरच्या कुटुंबीयांनी १२८ कोटींचा बंगला विकत घेतला.
मुंबई - हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्ट्राचाराच्या (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अटक केलेले Yes Bank चे संस्थापक राणा कपूर आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी परिचित होते. लंडनमध्ये संपत्ती जमवणारे राणा कपूर यांची भारतात देखील खूप संपत्ती आहे. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या अँटिलियाशेजारी राणा कपूरच्या कुटुंबीयांनी १२८ कोटींचा बंगला विकत घेतला. चला जाणून घेऊया हा बंगला कसा आहे आणि त्याची वैशिष्ट्य ...
भारतातील १० सर्वात महागड्या घरांमध्ये राणा यांच्या घराचा समावेश
२०१८ मध्ये Yes Bankचे संस्थापक राणा कपूर यांच्या कुटुंबीयांनी १२८ कोटी रुपये खर्च करून निवासी जमीन खरेदी केली. राणा यांच्या कुटुंबीयांनी याच जमिनीवर स्वप्नांचा राजवाडा बांधला आहे. बिझिनेस इनसाइडरच्या अहवालानुसार हे भारतातील १०सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. मुंबई उच्चभ्रू परिसरातील टोनी अल्तामाउंट रोडच्या भागात बंगला आहे. या इमारतीची पूर्वी सिटी ग्रुपची मालकी होती.
राणा कपूरचा बंगला 'अँटिलिया'ला लागून आहे
मुकेश अंबानी यांच्या बंगल्या 'अँटिलिया' च्या पुढे राणा कपूरचा बंगला आहे. ४४ अब्ज रुपये किंमतीच्या अँटिलियाशेजारील राणा यांच्या राजवाड्याबद्दल कमी बोलले जाते. पण सुविधांच्या बाबतीतही त्यांचा बंगला उत्कृष्ट आहे. हा बंगला हा खुर्शिदाबाद बिल्डिंगमध्ये ६ अपार्टमेंटमध्ये बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक राहतात. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला हेदेखील राणाच्या या बंगल्या शेजारी राहतात.
पत्नीच्या नावावर बंगला विकत घेतला होता
कपूरची पत्नी बिंदू आणि एका खासगी कंपनीच्या नावे ही इमारत खरेदी केली आहे. ही इमारत खरेदी झाल्यानंतर राणा म्हणाले, "माझ्या कुटुंबाने संपत्ती विकत घेतली आहे." दिल्लीत जन्मलेल्या राणा कपूर यांनी बँकर म्हणून सुरुवात केली आणि भारतातील चौथी मोठी खासगी बँक Yes Bank ची स्थापना केली. दक्षिण मुंबईत जवळपास वर्षभर शोध घेतल्यानंतर राणा कपूरच्या पत्नीने हा बंगला विकत घेतला. या इमारतीचे एकूण बिल्ड अप एरिया १४८०० चौरस फूट आहे.
राणाचा 'राजवाडा' देखील समुद्रासमोर आहे
मुंबईच्या पॉश भागात वरळी येथील समुद्र महल बिल्डिंगमध्येही राणा कपूरचा फ्लॅट आहे. अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाने समुद्राच्या अगदी समोर असलेल्या त्याच घरात छापा टाकला होता. समुद्र महल हा मुळात एक बंगला होता. ग्वाल्हेरच्या सिंधिया कुटुंबाच्या मालकीची होती आणि त्यांनी तो १९६० च्या दशकात विकला. या इमारतीत 3 बीएचके, डुप्लेक्स आणि ट्रिप्लेक्स फ्लॅट आहेत. याची किंमत प्रति चौरस फूट सुमारे १.२ लाख रुपये आहे. २०१६ मध्ये येथील एक प्रॉपर्टी १८.५ कोटी रुपयांना विकली गेली. ही नीरव मोदी, नंदन निलेकणी आणि एनआर नारायण मूर्ती यांची संपत्ती आहे. ३ बीएचके फ्लॅटचे भाडे दरमहा सुमारे ४ लाख रुपये आहे.
लंडनमध्येही राणा यांची अफाट मालमत्ता
लंडनमध्येही राणा कपूरची अफाट मालमत्ता आहे. ईडीच्या रडारवर सुमारे २ हजार कोटी गुंतवणूक, ४४ महागड्या पेंटिंग्ज आणि डझनभर शेल कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या मदतीने राणा कपूर आणि कुटुंबीयांना पैसे हस्तांतरित केले जात होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये असे काय झाले की राणा कपूर यांनी Yes Bank तील आपले सर्व समभाग विकले हे ईडीच्या अधिकाऱ्यांना जाणून घ्यायचे होते. कारण Yes Bank मधील आपले शेअर्स कधीच विकणार नाही असे राणा सांगत, त्यांनी त्यास त्यांचा हिरा मानला होता.