Join us

हो, काँग्रेस जिंकू शकते! टिळक भवनमध्ये कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 5:53 AM

कार्यकर्त्यांची मेहनत आणि शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्ग, मागासवर्ग समाज अशा सर्वांनी पक्षाला भरभरून मतदान केल्याने पक्षाला पुन्हा ‘अच्छे दिन’ आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

- योगेश बिडवईमुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात सर्वाधिक १३ जागांवर विजय मिळविल्याने पक्षात पुन्हा नवा उत्साह संचारला आहे. शुक्रवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची व नवनियुक्त खासदारांची टिळक भवन येथे बैठक झाली. या वेळी नवनियुक्त खासदारांबरोबर राज्यभरातून काही कार्यकर्तेही टिळक भवनला आले होते. हो, काँगेस जिंकू शकते, असा आत्मविश्वास त्यांच्यात जाणवत होता.

कार्यकर्त्यांची मेहनत आणि शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्ग, मागासवर्ग समाज अशा सर्वांनी पक्षाला भरभरून मतदान केल्याने पक्षाला पुन्हा ‘अच्छे दिन’ आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. टिळक भवनमध्ये सकाळी ११ वाजेपासूनच शुक्रवारी प्रमुख नेते आणि खासदारांची लगबग सुरू झाली होती. प्रमुख नेते बैठकीला गेल्यानंतर कार्यकर्ते काहीसे मोकळे झाले. ते गटागटाने चर्चा करताना दिसत होते. विषय अर्थातच लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाचा होता. भौ, आले की नाही विदर्भातील सीट... मी म्हणत होतो.

काँग्रेस- विदर्भाचं नातं आहे. त्यावर दुसरा कार्यकर्ता... हाऊ ना भौ... मेहनत बी घेतले ना बे... असं म्हणून कार्यकर्त्यांचंही कौतुक करत होता. अमरावती, नांदेड, नाशिक, धुळे, लातूर, सातारा, पुणे, यवतमाळ असे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आले होते. मध्य प्रदेश, कर्नाटकने साथ दिली असती तर सरकार आले असे, असे कोणी म्हणत होते. तर, नितीशकुमारांचे काही सांगता येत नाही. चंद्राबाबू नायडू अजून पूर्णपणे तिकडे गेलेले नाहीत, अशी भावना कोणीतरी व्यक्त करत होते. 

मुंबईतही पक्षाला मिळाले बळमुंबईतही काँग्रेस एका जागेवर विजयी झाल्याने पक्षाला बळ मिळाल्याचे मिलिंद केसरकर, नरेश दळवी, धर्मेंद्र पटेल, शांताराम चाळके, वीरेंद्र पाठारे, अशोक खरात (सर्व दादर विभाग), श्रीकांत आढांगळे, गणेश गायकवाड (कुर्ला विभाग) हे कार्यकर्ते सांगत होते.

विधानसभा निवडणुकीत एक नंबर होऊविधानसभा निवडणुकीतही पक्षाला मोठे यश मिळेल. पक्षाला सर्वाधिक जागा मिळून काँग्रेस एक नंबरचा पक्ष होईल, असा विश्वास जहीरभाई सौदागर, जमीरखान पठाण (अमरावती), अकबर खान (भिवंडी), योगेश चव्हाण (पुणे), गजानन देसाई (नाशिक) या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 

मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचे हे फळ आहे. या निवडणुकीत सर्व समाजाचा पक्षाला पाठिंबा मिळाला. - ॲड. पल्लवी रेणके, प्रदेशाध्यक्ष, भटके विमुक्त विभाग

नांदेडमध्ये पक्षाला मिळालेले यश अभूतपूर्व आहे. फोडाफोडी लोकांना आवडली नाही. - विठ्ठल पावडे, जिल्हा उपाध्यक्ष, नांदेड

टॅग्स :काँग्रेसमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४