हो, ती मीच होती, 'त्या' रात्री मोहित कंबोज यांच्यासोबत असलेल्या महिलेचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 09:08 AM2023-05-02T09:08:44+5:302023-05-02T09:11:46+5:30
खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कंबोज यांच्यावर आरोप केले होते.
मुंबई - भाजपा आणि ठाकरे गटात विविध विषयांवरून धुसफूस सुरू आहे. त्यातच शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी २९ एप्रिल रोजी पहाटे खार पश्चिम, लिंक रोड येथे घडलेल्या घटनेकडे लक्ष वेधत भाजप नेते मोहित कंबोज यांच्याबाबत मोठे विधान केले. बारमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली होत्या. त्यांच्या गराड्यात भाजपचे नेते मोहित कंबोज हे मद्यधुंद अवस्थेत होते असा आरोप राऊतांनी केला. त्यावर संबंधित मुलीने खुलासा केला आहे.
अक्षा कंबोज यांनी ट्विटरद्वारे मोहित यांच्यावर होणाऱ्या आरोपावर भाष्य केले आहे. अक्षा कंबोज म्हणाल्या की, कौटुंबिक मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी शनिवारी रात्री रेडिओ बारमध्ये मोहित कंबोज भारतीय सोबत मी एकमेव मुलगी होते, कोण काय म्हणत आहे याने फरक पडत नाही. खोट्या बातम्या, चुकीच्या अफवा कधीही टिकणार नाहीत असं तिने म्हटलं.
I Was the only GIRL With Mr Mohit Kamboj Bharatiya On Saturday Night At Radio Bar For A Family Friend Birthday Party , It Does Not Make A Difference Who Is Saying What .
— Aksha Kamboj (@akshakamboj) May 2, 2023
Fake Stories - Narratives Won’t Lasts ! pic.twitter.com/25coFw0bbL
कोण आहे अक्षा कंबोज?
अक्षा कंबोज या मोहित कंबोज यांच्या पत्नी असून स्वत: उद्योजिकाही आहेत. मोहित यांच्या रिसोर्ट, हॉटेल आणि अनेक प्रॉपर्टीत बहुतांश कामकाज अक्षा सांभाळतात. काही कंपन्यांमध्ये अक्षा संचालिका आहेत. अक्षा कंबोज यांनी मॅनेजमेंटमधून पदवीचं शिक्षण घेतले आहे. सेलेब्रिटी क्रिकेट लीगच्या सदस्या आहेत.
काय आहे प्रकरण?
खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कंबोज यांच्यावर आरोप केले होते. मुंबईत रेस्टॉबार साधारण १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असताना खार येथील ‘रेडिओ’बार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता. आतील धिंगाण्याचा आजूबाजूच्या परिसराला त्रास होऊ लागला. बाहेर वाहतूककोंडी झाली म्हणून संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे हे आत जाऊन विनंती करू लागले. तेव्हा त्यांनाच धक्काबुक्की झाली. बारमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली होत्या. त्यांच्या गराड्यात भाजपचे नेते मोहित कंबोज हे मद्यधुंद अवस्थेत होते. कांबळे यांनी पोलिसांना पाचारण केले. मात्र कंबोज हे पोलिसांशी अर्वाच्य भाषेत बोलू लागले. याप्रकरणी हॉटेल व बाहेरचे सीसी फुटेज पोलिसांनी तपासावेत. कारण ही बाब कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आहे. शनिवारी पहाटेपर्यंत येथे अमली पदार्थांचे सेवन, विक्री सुरू होती. खार येथील हा बार कोणाच्या मालकीचा आहे. त्याचा तपास करून पोलिसांनी कारवाई करावी आणि बारचा परवाना रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
कंबोज यांचं प्रत्युत्तर
संजय राऊत यांच्या ट्वीटला ट्विटरवर उत्तर मोहित कंबोज यांनी दिले. त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नसते. योग्य वेळी योग्य ते उत्तर मी माझ्या पद्धतीने देईल. हे सगळे करण्यामागे नेमका कोणता डाव आहे हे तपासले पाहिजे. आम्ही लवकरच यावर तथ्यपूर्ण उत्तर देऊ असं ते म्हणाले.