मुंबई- दिवंगत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिवस उद्या १९ नोव्हेंबर रोजी आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत पवित्र स्मृतींना वंदन करून त्यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार किरण पावसकर, आमदार डॉ मनीषा कायंदे, आमदार रवींद्र फाटक, नरेश म्हस्के तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईतीलमेट्रोची घोषणाही केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, उद्या शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांचा ११ वा स्मृती दिवस आहे. स्मृतिदिवसाच्या पूर्वसंध्येला मी माझ्याकडून व आमच्या समस्त शिवसेना पक्षाकडून त्यांना आदरांजली वाहत असून त्यांना मनापासून नमन करत आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन त्यांना अपेक्षित असलेले काम आम्ही गेली दीड वर्षे करतोय. बाळासाहेबांचे स्वप्न होते की अयोध्येत राममंदिर उभे राहावे आणि ते राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आणि त्याचे लोकार्पण येत्या दि,22 जानेवारीला होणार आहे. २३ जानेवारीला बाळासाहेबांचा वाढदिवस असतो, त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी राम मंदिर खुले करणार आहोत.
नवी मुंबई मेट्रो उद्यापासून सुरू होणार आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी त्याची पाहणी केलेली असून उद्या विना उद्घाटन आम्ही मेट्रो सुरू करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.