पूनम अपराज
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. वानखेडेंचा पहिला निकाह लावणाऱ्या मौलाना मुझम्मील अहमद यांनी केलेल्या दाव्यांमुळे प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. निकाहावेळी समीर वानखेडे आणि शबाना दोघेही मुस्लिम होते. समीर मुस्लिम नसते, तर मी त्यांचा निकाह लावलाच नसता, असा दावा त्यांनी केला आहे. यावर समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता, त्यांनी देखील निकाहनामा खरा असल्याचं सांगितलं. प्रथमच शबाना यांनी लोकमतकडे आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच लग्नानंतर घरी तुम्ही हिंदू की मुस्लिम चालीरीतीनुसार संसार करत होता असा प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. तसेच समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद आहे का, यावर देखील शबाना यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.
२००६ मध्ये समीर आणि शबाना यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी समीर यांनी आपण मुस्लिम असल्याचं सांगितलं होतं, अशी माहिती मौलाना मुझम्मील अहमद यांनी दिली. मंत्री नवाब मलिक यांनी शेअर केलेला निकाहनामा खरा असल्याचं देखील मौलानांनी म्हटलं आहे. ज्यावेळी मी निकाह लावला होता. निकाहनामा अगदी योग्य आहे. त्यावेळी समीर, शबाना (समीर यांची पहिली पत्नी), त्याचे वडील सगळे मुस्लिम होते. समीर हिंदू असते, तर निकाहचा झाला नसता. कारण शरियतनुसार असा निकाह होत नाही. शरियतविरोधात जाऊन काझी निकाह लावत नाही. आज समीर काहीही सांगत असले, तरीही त्यावेळी ते मुस्लिमच होते,' असा दावा मौलाना मुझम्मील अहमद यांनी काल केला होता.