मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरात आपली दुसरी सभा घेतली. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाल्यानंतर थेट औरंगाबादेतून त्यांनी मनसैनिकांना आवाहन केलं होतं. यावेळी, औरंगाबादचा उल्लेख त्यांनी संभाजीनगर केला होता. आता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवार 8 जून रोजी औरंगाबादेत सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवरही होय संभाजीनगरच... असा उल्लेख करण्यात आला आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या 8 जून रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची घोषणा करतील असा दावा शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे करत आहेत. मात्र, हा दावा चुकीचा असल्याचं केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट केलं आहे. औरंगाबाद शहराच नामांतर संभाजीनगर करण्याची शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. विशेष म्हणजे सध्या मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानाही हे नामांतर न झाल्याने विरोधक शिवसेनेवर टिका करत आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला जातो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सभेत बोलताना औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर असे म्हटले होते. त्यानंतर, आता शिवसेनेकडून बुधवार 8 जून रोजीच्या सभेसाठी होय संभाजीनगरच... असे म्हणत बॅनरबाजी केली आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा बॅनर झळकवण्यात आला असून त्यावर उद्धव ठाकरेंचा फोटोही आहे. त्यामुळे, औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उद्याच्या सभेत निघणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नामांतरणाचा कुठलाही प्रस्ताव नाही - कराड
मराठवाड्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामकरणाचा मुद्दा सध्या जोर धरत आहे. दरम्यान, या शहरांच्या नामांतराचा कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे आलेला नसून, काहीजण हवेत बाता मारत आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. 'लोकमत'शी बोलताना कराड यांनी ही माहिती दिली.
'राज्य सरकार राजकारण करत आहे'
कराड म्हणाले की, "माझ्या माहितीनुसार, राज्य सरकारने अद्याप अशाप्रकारचा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी काहीलोक चुकीची माहिती देत आहेत. चंद्रकांत खैरे जो प्रचार करत आहेत, तो चुकीचा आहे. दोन्ही शहरांचे नावे बदलण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण राज्य सरकार नावावरुन राजकारण करत आहे," असा आरोपही कराड यांनी यावेळी केला.