मुंबई - अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधीविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. रिपब्लिकन भारत या वृत्तवाहिनीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या आशीर्वादानेच पहाटेचा शपथविधी झाला होता, असा दावा फडणवीस यांनी केला. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार यावे म्हणून शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या या मुलाखतीवर आता शरद पवारांनी आपली बाजू मांडली आहे.
शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीचा उलगडा केला. तसेच, पहाटेच्या शपथविधीपूर्वी आमची बैठक झाली होती, आमची चर्चाही झाली होती, असे म्हणत शरद पवारांनी फडणवीसांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, या घडामोडीची संपूर्ण स्टोरी सांगत शरद पवारांनी गौप्यस्फोटही केला.
सन २०१४ मध्ये भाजपला बाहेरुन पाठिंबा देण्याची घोषणा आम्ही केली होती, पण तो देण्याची वेळ आली नाही. पण, तो पाठिंबा देण्याची त्यामागची आमची काही कारणं होती. त्यांच्या आणि त्यांच्या नेत्यांमध्ये कसं अंतर पडेल याची काळजी आम्हाला घ्यायची होती, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच, पहाटेच्या शपथविधीपूर्वी ते मला भेटले हे खरंय, त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा केली हेही खरंय. पण, त्यांनी स्वत:च काल सांगितलंय की याबाबतचं धोरण मी बदललं दोन दिवसांनी. मग, जर दोन दिवसांनी मी धोरण बदललं असेल तर, त्याच्या दोन दिवसांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं?, असा सवाल शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे.
फडणवीसांनी अशी चोरून पहाटे शपथ घेण्याची घाई का केली. जर आमचा त्यांना पाठिंबा होता तर २ दिवसांत ते सरकार राहिलं का तिथे, दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली. त्यांना राजीनामा द्यायला लागला. याचा स्पष्ट अर्थ आहे की, सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो ही जी भाजपची भावना होती. भाजपचा हा चेहरा समाजापुढे आणण्यासाठीच काही गोष्टी केल्या होत्या, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पहाटेच्या शपथविधीच्या अंकावर यानिमित्ताने शरद पवारांनी पडदाच टाकला असं म्हणता येईल.
शरद पवारांच्या या डावात मोदी फसले की फडणवीस, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावेळी, सत्तेशिवाय करमत नव्हतं, ते मोदी नव्हते. ते राज्याचे होते, आम्ही कसे अस्वस्थ होतो. आम्ही त्याशिवाय कसे जगू शकत नाही, हे महाऱाष्ट्रासमोर येण्याची अस्वस्थता होती, असे म्हणत पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला.