‘हो, आम्हाला माहीत होते... परीक्षा क्लासमध्येच होणार!’
By Admin | Published: May 27, 2017 03:04 AM2017-05-27T03:04:36+5:302017-05-27T03:04:36+5:30
नामदार अजित पवार कॉलेजमध्ये प्रवेश घेतानाच विज्ञानाची परीक्षा ही खासगी क्लासमध्ये घेतली जाणार असल्याचे आश्वासन विद्यार्थी आणि पालकांना देण्यात आले होते,
गौरी टेंबकर-कलगुटकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नामदार अजित पवार कॉलेजमध्ये प्रवेश घेतानाच विज्ञानाची परीक्षा ही खासगी क्लासमध्ये घेतली जाणार असल्याचे आश्वासन विद्यार्थी आणि पालकांना देण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या कॉलेजच्या शिक्षकांचा जबाब पोलिसांनी नोंदविला, तेव्हा हे उघड झाले. त्यानुसार या प्रकरणी पालक आणि विद्यार्थ्यांचेदेखील जबाब चारकोप पोलिसांनी नोंदवले आहेत.
चारकोप पोलिसांनी चार शिक्षकांसह एका शिक्षण अधिकाऱ्याचा जबाब नोंदविला आहे. या जबाबात शिक्षकांनी पोलिसांना दिलेल्या महितीनुसार, या कॉलेजमध्ये प्रवेश घेतानाच विज्ञान विषयाची परीक्षा ही मकरंद गोडस कॉलेजमध्ये घेतली जाणार आहे, असे पालकांना सांगण्यात आले होते. त्यामुळेच या सर्व विद्यार्थ्यांनी गोडसच्या खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतला. ही बाब कॉलेजच्या प्राचार्यांसह शिक्षक तसेच शिक्षण विभागाच्या काही अधिकाऱ्यांना माहिती होती, अशीही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या प्रकरणी एकूण पाच विद्यार्थी आणि आठ पालक अशा १३ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. मात्र सध्या विद्यार्थी परीक्षेत व्यस्त असल्याने सर्वच विद्यार्थ्यांना बोलावण्यात न आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक चौकशी शिक्षण विभागच करत आहे. त्यामुळे आम्ही निव्वळ कॉलेजमध्ये अपेक्षित असलेली ही परीक्षा क्लासमध्ये झाली हे सिद्ध करणारे पुरावे गोळा करत असल्याचे चारकोप पोलिसांकडून सांगण्यात आले.