Join us

होय, आम्ही कोरोनावर मात केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत देशात दररोज लाखो रुग्ण कोरोनाबाधित होत असल्याने देशातील आरोग्य यंत्रणा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत देशात दररोज लाखो रुग्ण कोरोनाबाधित होत असल्याने देशातील आरोग्य यंत्रणा व पोलीस यंत्रणेवर ताण आला आहे. कोरोना झाला म्हणजे मोठे संकट कोसळले, अशा प्रकारची भीती अनेकांच्या मनात आहे; मात्र देशासह राज्यात व शहरात आता कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेतल्यास कोरोना बरा होतो, हे यातून स्पष्ट होते. मुंबईतील शेट्टी व यादव कुटुंबीयही याचे एक चांगले उदाहरण आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेऊन शेट्टी व यादव कुटुंबाने कठीण परिस्थितीतही कोरोनावर मात केली आहे.

खासगी कंपनीत काम करणाऱ्या दहिसर येथील संगीता शेट्टी यांच्या कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. संगीता शेट्टी यांच्यासह त्यांचे पती, मुलगा व सासूला कोरोनाची लागण झाली. घरातील चाैघे कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्या घरात काहीसे चिंताजनक वातावरण होते. त्यातच सासूचे निधन झाल्यामुळे त्यांची चिंता अधिक वाढली; परंतु अशा परिस्थितीतही खचून न जाता व न डगमगता त्या सर्वांनी कोरोनावर मात करण्याचा निश्चय केला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेत त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोनावर मात केली.

संगीता शेट्टी सांगतात की, कोरोनाचा काळ सर्वांसाठी कठीण असला तरी आपल्या आरोग्य यंत्रणेवर सर्वांनी विश्वास ठेवायला हवा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य वेळेत औषधे व उपचार घेतल्यास कोरोना बरा होतो. नागरिकांनी घरात राहून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.

शेट्टी कुटुंबाप्रमाणेच शिवडी येथील शिक्षिका असणाऱ्या सविता यादव यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पहिल्या लॉकडाऊननंतर नियम शिथिल केल्यानंतर कामानिमित्त त्यांचे घराबाहेर जाणे वाढले. यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांच्यासह त्यांच्या सासूला कोरोनाची लागण झाली. सविता यादव या स्वतः गरोदर असल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. गरोदर असल्याने त्यांना काही प्रमाणात चिंता वाटत होती; मात्र डॉक्टरांचा सल्ला व योग्य उपचार घेतल्याने त्या कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतल्या.

सविता यादव सांगतात की, कोरोनाला घाबरून जाऊ नका, तसेच आपला आजार व दुखणे अंगावर काढू नका. वेळेत उपचार घेतले तर कोरोना बरा होतो. त्यामुळे सतत आशावादी आणि सकारात्मक मानसिकतेत राहा.

..................................