Join us

...तरीही त्याच तेलात तळले जातात समोसे, वडे; १ हजार ७९७ ठिकाणच्या तेलाचे नमुने तपासले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 2:18 PM

एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत १ हजार ७९७ ठिकाणचे तेल तपासले असून त्यात १०६२ नमुने प्रमाणित आढळले आहे, तर १०३ नमुने कमी दर्जाचे आढळले आहेत.

 मुंबई : पदार्थ तळण्यासाठी तेलाचा वारंवार वापर करू नये, अशी विक्रेत्यांना ताकीद दिली असतानाही काही विक्रेते तेलात वारंवार समोसा, वडा, भजी यांसारखे पदार्थ तळत असल्याचे आढळून आले आहे. या विरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने ‘एफडीए’च्या वतीने याविरुद्ध मोहीम घेण्यात आली. एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत १ हजार ७९७ ठिकाणचे तेल तपासले असून त्यात १०६२ नमुने प्रमाणित आढळले आहे, तर १०३ नमुने कमी दर्जाचे आढळले आहेत.

खासगी एजन्सीद्वारे तपासणीतळून काळ्या झालेल्या तेलात पुन्हा पदार्थ तळले जाऊ नयेत यासाठी केंद्र सरकारकडून काही एजन्सी नेमण्यात आल्या असून, त्यांच्याकडून हे तेल जमा केले जाते. या तेलापासून बायोडिझेल तयार करण्यात येते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

असे मिळते प्रमाणपत्रअन्न सुरक्षा व मानदे कायदा २००५ नुसार राज्यातील सर्व हॉटेल,  खाद्य पदार्थ, वडापावासारख्या खाद्यान्न विक्रेत्यांनी परवाना व नोंदणी एफडीएने करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासून हॉटेल, छोटे-मोठे खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या परवाना व नोंदणी करण्यात येते. यात अन्न सुरक्षेचे नियम पडताळून, तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात येते. 

हायजिन रेटिंगमुळे कळणार अन्नाचा दर्जाईट राईट ही योजना उपाहारगृहांसाठीच नाही, तर छोट्या विक्रेत्यांसाठीदेखील असणार आहे. फळविक्रेत्यांकडे असलेली फळेदेखील तपासली जाणार आहेत. कर्मचारी कशाप्रकारे अन्न शिजवतात, कशा प्रकारे वाढतात याचे निरीक्षण केले जाणार असून, त्याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. या परिसरात असलेली पाण्याची व्यवस्था कशी आहे, हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, तसेच यातील घटक द्रव्यांचीही तपासणी केली जाणार आहे.

तक्रार करण्याचे आवाहन

सक्षम अधिकाऱ्याने दिलेले निर्देश किंवा आदेशाचे प्रत्येक अन्न व्यावसायिकांनी पालन करणे बंधनकारक असून नियमांचे पालन न केल्यास जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विक्रेते नियमांचे पालन करत नसल्यास  तक्रार प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :मुंबई