लोकमत न्यूज नेटवर्क,
मुंबई : अपघात होऊ शकतो, याचा अंदाज असतानाही संजय मोरेने बेस्टची इलेक्ट्रिक बस बेदरकारपणे चालविली, असा दावा सरकारी वकिलांनी संजय मोरेच्या जामीन अर्जावर आक्षेप घेताना मुंबई सत्र न्यायालयात केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयाने शनिवारी मोरेच्या जामीन अर्जावरील निर्णय १० जानेवारीपर्यंत राखून ठेवला.
कुर्ला बेस्टअपघातातील आरोपी संजय मोरे याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर न्या. व्ही. एम. पाठाडे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. सरकारी वकिलांनी मोरेच्या जामीन अर्जावर आक्षेप घेताना म्हटले की, मोरेची जामिनावर सुटका केल्यास तो फरार होऊ शकतो. तसेच या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.
बसचा अपघात होऊ शकतो, याचा अंदाज असतानाही त्याने बस बेदरकारपणे चालविली, असा आरोपही सरकारी वकिलांनी केला. सोमवारी सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे आरटीओच्या अहवालात म्हटल्याचे नमूद केले आहे. तसेच सेवेत असताना त्याने मद्यप्राशन केले नसल्याचेही एफएसएलच्या अहवालात म्हटल्याचे नमूद केले आहे. सरकारी वकिलांनी केलेल्या दाव्यावर मोरे याचे वकील समाधान सुलाने यांनी आक्षेप घेतला. आरटीओच्या अधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक बससंदर्भात काही प्रशिक्षण देण्यात आले आहे का? त्यांना माहिती नसतानाही त्यांनी हा अहवाल सादर केला आहे.