मुंबापुरीत साजरा झाला ‘योग दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 01:06 AM2019-06-22T01:06:54+5:302019-06-22T01:07:08+5:30

विद्यार्थी, वृद्ध, नौदलाचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग

'Yoga Day' celebrated in Mumbai | मुंबापुरीत साजरा झाला ‘योग दिवस’

मुंबापुरीत साजरा झाला ‘योग दिवस’

googlenewsNext

मुंबई : शाळांपासून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांनी योगासनांची प्रात्यक्षिके करण्यासाठी हिरीरीने सहभाग घेतला. जागतिक योग दिनाचे यंदाचे पाचवे वर्ष होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योग करणे किती महत्त्वाचे आहे, हे योग दिनाच्या पटवून दिले गेले. जागतिक योग दिनानिमित्त मुंबापुरीत ठिकठिकाणी योग करून योग दिवस साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, सरकारी कार्यालयांमध्ये योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कामाठीपुºयातील देहविक्री करणाºया महिलांनी केली योगासने
‘जागतिक योग दिवसा’चे औचित्य साधून सोशल अ‍ॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन संस्थे(साई)ने योग दिवस साजरा केला. चिंचपोकळी पूर्वेकडील नागरिक विकास परिषद येथे योगाभ्यास कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मिस एलिट एशिया गुडविल योगक्वीन श्वेता वर्पे यांनी देहविक्रय करणाºया महिलांना योगाचे धडे दिले. कार्यक्रमास नगरसेविका सुरेखा लोखंडे, समाजसेवक रोहिदास लोखंडे, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे रोझेलीन डुंगडुंग आणि साई संस्थेचे अध्यक्ष विनय वस्त आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना योगाचे धडे
दादर पश्चिमेकडील शारदाश्रम मुलांचे माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी तळमजला सभागृहात योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी योगशिक्षिका प्रतिभा रसाळ, ऋता खांबेटे आणि अंकिता विलणकर यांनी शिथिलीकरण, ताडासन, वृक्षासन, भद्रासन, वज्रासन, वक्रासन, उत्तानमंडुकासन सूर्यनमस्कार, पर्वतासन इत्यादी आसने विद्यार्थ्यांकडून करून घेतली व त्यांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास वाढावा, यासाठी योगासन हा उत्तम पर्याय आहे, असे मुख्याध्यापिका विद्या गुप्ते यांनी सांगितले.

अंधेरीत आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न
आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आज पाचवा योग दिन साजरा केला. अंधेरी पश्चिमेकडील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल शाळेत पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना विशेष योग दिनाचे आयोजन केले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री देसाई यांनी विद्यार्थ्यांना शरीर व मनाच्या संतुलनासाठी योगाचे महत्त्व स्पष्ट केले. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या योगा प्रशिक्षक टिष्ट्वंकल यांनी योगाचे धडे दिले.

वरळी येथे प्रभातफेरी
ओम शिव योग साधना वरळी कोळीवाडा व योग साधना केंद्रातर्फे जागतिक योग दिनानिमित्त प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगाचे महत्त्व किती आहे, हे साºया जगाला पटवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर योगाचा प्रचार व प्रसार व्हावा, या बहुउद्देशाने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभातफेरीमध्ये मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, वरळी विधानसभेचे आमदार सुनील शिंदे यांची उपस्थिती होती. योग केंद्राचे मुख्य व्यवस्थापक देवकीनंदन मुकादम यांनी उपस्थितांचे स्वागत करून, प्रभातफेरीच्या आयोजनाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर, संस्थापक हरिश्चंद्र भगत यांनी योग साधकाना योग किती महत्त्वाचा आहे व योगाने विविध व्याधी कशा बºया होतात, याची माहिती दिली. या प्रभातफेरीमध्ये शेळके-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनता हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

वांद्र्यात योग दिन संपन्न
आज वांद्रे पश्चिमेकडील योगा पार्क येथे आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने पोलीस, नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योगा कार्यक्रमाचे आयोजन शालेय शिक्षण, क्रीडा, युवक कल्याणमंत्री आशिष शेलार यांनी केले होते. याप्रसंगी ओनएजीसीच्या सीएसआर फंडातून आणि आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून प्रोमोनाड परिसरात फिटनेस पार्क उभारण्यात आले असून, त्यातील स्केटिंग ट्रॅकचे लोकार्पण करण्यात आले.

योग सर्वांनी नित्याने योगा करावा. विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये योगाची आवड निर्माण व्हावी, म्हणून हा योग दिन महत्त्वाचा आहे, असे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, अभिनेते मनोज जोशी आणि मुंबई पोलीस दलातील अधिकारी, जवान, नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांनी एकत्रित योगा केला.

‘योगा से ही होगा’ प्रसिद्ध कार्टुन्स कलाकाराकडून लहानग्यांना संदेश
मनोरंजन विश्वातील कार्टुन्स वाहिन्यामध्ये काही प्रसिद्ध कार्टुन कलाकार हे आपल्या कलाकारीने लहानग्यांच्या मनात घर करतात. यामुळे जागतिक योग दिनानिमित्त ‘योगा से ही होगा’ असा संदेश मोटू-पतलू, शिवा, रूद्र या कार्टुन कलाकारांनी लहान मुलांना दिला आहे. हा कार्यक्रम मरिन ड्राइव्ह येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. ‘योग से ही होगा’ नावाच्या मजेदार आणि उत्साही मोहिमेतून शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा संदेश पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

विमानतळावर योग दिन साजरा
मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवरील टर्मिनल २ येथे जागतिक योग दिनानिमित्त कर्मचारी व प्रवाशांसाठी योगाभ्यास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योग हा एक सुंदर प्रकार असून, तो समजून घेणे, चिंतीत असलेल्या प्रवाशांमध्ये योगची जागरूकता वाढविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योगाभ्यास करण्यासाठी नागरिकांच्या सहाशे मीटर अंतरापर्यंत रांगा लावल्या होत्या.

पोलिसांचा सहभाग
सांताक्रुझ पूर्वेकडील ‘द योगा इन्स्टिट्यूट’तर्फे पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवारी मरिन लाइन्स येथे संपन्न झाला. यावेळी योगाभ्यास करण्यासाठी सर्व मुंबईकर एकवटले होते. द योगा इन्स्टिट्यूटच्या संस्थापिका हंसाजी योगेंद्र यांनी योगाबद्दल माहिती दिली. याप्रसंगी मुंबई पोलीस, एनसीसी कॅडेट्स, नौदलाचे अधिकारी, विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, तसेच
राजभवन, सरकारी विभाग, विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, कॉर्पोरेट इत्यादी ठिकाणी द योगा इन्स्टिट्यूटच्या कर्मचाऱ्यांनी योगाभ्यासाचे धडे उपस्थितांना दिले. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, भाजप नेत्या शायन एसी आदींची उपस्थिती होती.

दहिसरच्या योग दिन शिबिरात ३०० महिलांचा सहभाग
दहिसर पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स रेसिडेंट असोशिएशनच्या विद्यमाने माता सरस्वती उद्यानाच्या पटांगणात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. या योग दिन कार्यक्रमात सुमारे ३०० महिलांचा सहभाग होता.

लोकलमध्ये योगासनांची प्रात्यक्षिके
मुंबापुरीत अनेक ठिकाणी योगासनांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यंदा पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते बोरीवली आणि बोरीवली ते चर्चगेट लोकलमध्ये योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविली.
पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने एका पथकात चार सदस्य अशा २० पथकांनी योग दिन साजरा केला. लोकलमध्ये सकाळी ९ वाजेच्या दरम्यान ध्यानधारणा, योगासने, मनन, चिंतन प्रवाशांकडून घेण्यात आले. काही प्रवाशांनी उभे राहून किंवा बसून योगासने केली.
मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने धावत्या लोकलमध्ये योगासने करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे ठाणे येथील दहा योगासने, ध्यानधारणा पथकांनी नाराजी व्यक्त केली. लोहमार्ग पोलीस आयुक्तालयामार्फत घाटकोपर मुख्यालयात सकाळी ६ वाजता योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर आणि गुन्हे शाखेचे एकूण ३० वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि १४७ पोलीस अंमलदार उपस्थित होते.

‘योग हा दैनंदिन जीवनशैलीचा भाग’
योग हा दैनंदिन जीवनशैलीचा भाग आहे़ योग हा शरीर स्वस्थ ठेवण्याचा आणि विनाखर्चाचा उपाय आहे, त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी योगाकडे लक्ष केंद्रित करावे तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने रोज एक ते दीड तास ग्राउंड अ‍ॅक्टिव्हीटी करून स्वस्थ शरीर कमवावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी केले. कालिना येथील मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. विनोद पाटील, संचालक नवोपक्रम डॉ. समीर कुलकर्णी, वित्त व लेखा अधिकारी संजय शहा, प्राचार्या हेमलता बागला, कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ. सुधीर पुराणिक हे उपस्थित होते. सुहास पेडणेकर पुढे म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थी हे उद्याच्या समर्थ भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे़त स्वस्थ आणि सुंदर भारताची संकल्पना सत्यात उतरविण्याचे काम ही तरुणाई करणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: 'Yoga Day' celebrated in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.