Join us

उत्तर मुंबईत ठिकठिकाणी योग दिन साजरा 

By मनोहर कुंभेजकर | Published: June 21, 2023 2:58 PM

पोयसर जिमखानातर्फे आयोजित योग साधना कार्यक्रमात स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी सहभाग घेऊन योगाभ्यास केला. 

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आजच्या जागतिक योग दिनानिमित्त आज उत्तर मुंबईत विविध ठिकाणी योग साधना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी आपापल्या भागात योग साधना कार्यक्रम आयोजित करून सहभाग घेतला. पोयसर जिमखानातर्फे आयोजित योग साधना कार्यक्रमात स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी सहभाग घेऊन योगाभ्यास केला. 

पोयसर जिमखाना आयोजित योग सोहळ्याला पतंजली योगपीठाच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली परिवार, आदित्य महाविद्यालय, बंट समाज, अंबिका योग कुटीर, योग संस्कार संशोधन केंद्र, हार्ट फुलनेस आदी सर्व मान्यवर संस्थांनी आज खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ९ व्या जागतिक योग दिनाच्या योग साधना कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी योग शिक्षकांचाही सन्मान केला.

बोरिवली पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणाच्या विशाल मैदानात योग ध्यान कार्यक्रम सादर करण्यात आला. डॉ. घनश्याम शर्मा यांनी योगासने करून घेतली. योग शिक्षक ज्योती मेहता, ज्योती पोपट यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, पोयसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेश भंडारी, पदाधिकारी करुणाकर शेट्टी, हर्षद मेहता, माजी नगरसेविका प्रियांका मोरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

जागतिक योग दिनानिमित्त बोरिवली पश्चिमेच्या रस्त्यावरील योग साधना पुतळ्यांचे अनावरणही खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.निषाद कोरा यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :योगासने प्रकार व फायदेमुंबई