- संकेत सातोपे, मुंबईग्रामीण भागांतील शालेय मुलांमध्ये लोह, जस्त, तांबे, मॅग्नेशियम आदी पोषक घटकांची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळून येते. यावर मात करण्यासाठी रोजच्या आहारसोबतच योगसाधनेचा आधार घेतल्यास, या कमतरता सहज भरून येऊ शकतात. हे प्रयोगांती सिद्ध झाल्याचा दावा लोणावळा येथील कैवल्यधाम वैज्ञानिक संशोधन विभागामार्फत करण्यात आला आहे.या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील निवासी शाळांमध्ये शिकणाऱ्या ११ ते १५ वर्षे वयोगटातील ८२ मुलांवर योगाभ्यासाचा प्रयोग करण्यात आला. या सर्व मुलांमध्ये लोह, जस्तादी पोषक घटकांची कमतरता होती. यातील निम्म्या अर्थात ४१ मुलांकडून आठवड्यातले पाच दिवस सकाळी एक तास योगाभ्यास करून घेण्यात आला. १२ आठवड्यांनंतर या ४१ मुलांच्या शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून आलेली होती. योगाभ्यास न करणाऱ्या उर्वरित निम्म्या मुलांच्या आरोग्यात मात्र कोणतीही सुधारणा झाली नव्हती. विशेष म्हणजे या प्रयोगादरम्यान दोन्ही गटांतील मुलांच्या दिनचर्येत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.प्रयोगातील मुलांमध्ये पोषक घटकांचे प्रमाण वाढण्याबरोबरच त्यांची लवचिकता, पकड घेण्याची क्षमता आणि पचनशक्ती यातही खूप सुधारणा झाली आहे. कैवल्यधाम अशाच प्रकारचा प्रयोग आता शहरी शाळांतील मुलांवरही करणार आहे. ग्रामीण भागातील मुलांपेक्षा शहरी मुलांचा आहार आणि जीवनशैली भिन्न असते. त्यामुळे या प्रयोगातून कदाचित वेगळे निष्कर्ष समोर येऊ शकतात, असे कैवल्यधामच्या साहाय्यक संशोधिका अनिता वर्मा यांचे मत आहे.योगाभ्यास हा पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी तसेच उपयुक्त आहे, असे सिद्ध होत आहे. तो खर्चात करता येतो, त्यामुळे योगभ्यास सर्व शाळांमध्ये शिकविला जाण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन कैवल्यधामने केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी योग ‘आरोग्यदायी’!
By admin | Published: February 13, 2016 2:57 AM