मुंबईत असाही ‘योग’
By Admin | Published: June 22, 2017 04:48 AM2017-06-22T04:48:36+5:302017-06-22T04:48:36+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून मुंबईकरांनी सकाळपासून योगाभ्यास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून मुंबईकरांनी सकाळपासून योगाभ्यास केला. एरव्ही घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांनी बुधवारी पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांना हजेरी लावून अगदी कार्यालयांमध्ये योगासने केली. शिवाय, योगाभ्यास या दिनामुळे ग्लॅमर प्राप्त झाल्याने अगदी मंत्र्यांपासून सेलिब्रेटींनीही यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत योगाचे धडे गिरविले. हा योग दिनाचा फिव्हर फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअॅपवरही दिसून आला.
मंत्रालयातील प्रांगणातही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, वन विभागाचे सचिव विकास खारगे, सहसचिव सुरज मांढरेंसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिक केले. (संबंधित छायाचित्रे पान ४ वर)
नियमित योग करण्याची प्रतिज्ञा
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परेल येथील ग. द. आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी योग प्रशिक्षणात भाग घेऊन नियमित योगासने करण्याची प्रतिज्ञा केली. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ योग प्रोफेशन आणि आंबेकर प्रतिष्ठान कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.
महाविद्यालयातही ‘योग’
परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये योग दिनाच्या निमित्ताने दैनंदिन जीवनामध्ये योगाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी एन.एस.एस., एन.सी.सी. व शिक्षकवृंद यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा केला.
विद्यार्थ्यांनी दररोज योगा करावा यासाठी स्पर्धात्मक पद्धतीने योगासने घेण्यात आली. त्याचप्रमाणे, मुंबई विद्यापीठ आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूटच्या प्रांगणातही योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली.
क्रीडा विभागाच्या कर्मचाऱ्यांचा योगा
धारावी क्रीडा संकुलात योग दिवस साजरा करण्यात आला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई व नेहरू युवा केंद्र संघटन, राज्य कार्यालय मुंबई यांच्या विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
डोंगरीच्या निरीक्षणगृहात योग दिन
उमरखाडी, डोंगरी येथील निरीक्षणगृहात महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे आयुक्त कमलाकर फंड यांच्यासह योग प्रशिक्षक, चिल्ड्रन एड् सोसायटीचे अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
रेल्वे कर्मचाऱ्यांनीही केला योगा
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता यांनी स्वतंत्रपणे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह योग प्रात्यक्षिके सादर करत योग दिन साजरा केला. मध्य रेल्वेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सभागृहात योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. म.रे.च्या विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारीवर्गाने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
त्याचप्रमाणे योगाचे महत्त्व, योगाची परंपरा यांच्याविषयी महाव्यवस्थापकांनी संबोधित केले. यावेळी सर्वांनी नियमित योगाची प्रतिज्ञा केली.
जवानांनी केला योगाभ्यास : राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांच्या नेतृत्वात राज्य राखीव पोलीस दलातील अधिकारी आणि तब्बल ४५० जवानांनी बुधवारी सकाळी योग करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८च्या कवायत मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.