विद्यापीठात होणार योगशास्त्राचा अभ्यास, संस्कृत विभागाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 07:20 AM2023-03-05T07:20:23+5:302023-03-05T07:20:48+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा योगदिन घोषित केल्यानंतर जागतिक पातळीवर योगाभ्यासाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा योगदिन घोषित केल्यानंतर जागतिक पातळीवर योगाभ्यासाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही आता योगशास्त्राचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या संस्कृत विभागामार्फत नव्या शैक्षणिक वर्षापासून ‘मास्टर इन संस्कृत-योगशास्त्र’ या अभ्यासक्रमाची सुरुवात होणार आहे. योगासनांकडे केवळ शारीरिक व्यायाम म्हणून पाहिले जाते. त्यामुळे खऱ्या अर्थाने योगशास्त्राचा अभ्यास व विचार समाजात रुजवण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम निश्चितच महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. शकुंतला गावडे यांनी व्यक्त केले.
विद्यापीठात सुरू होणाऱ्या या दोन वर्षीय पूर्णवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रमाची घोषणा विभागामार्फत नुकत्याच पार पडलेल्या ‘योग-सिद्धांत आणि उपयोजन’ या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात करण्यात आली. योगशास्त्राचे सिद्धांत संस्कृत भाषेमध्ये असल्याने योगशास्त्र पर संस्कृत ग्रंथांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. पातंजल योगसूत्र, योगसूत्रावरील टीका ग्रंथ, हठयोगप्रदीपिका वगैरे ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. योगशास्त्र केवळ शारीरिक व्यायाम नसून यामध्ये मानसशास्त्र, अध्यात्मशास्त्र, तत्त्वज्ञान दिसून येते.
तसेच योगशास्त्राचे ध्येय केवळ शारीरिक स्वास्थ्यापुरतेच मर्यादित नसून मानसिक व आध्यात्मिक शांती मिळविणे हे आहे, अशी माहिती डॉ. गावडे यांनी दिली.
योगाच्या सिद्धांताचा पाया बळकट हवा
मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत ‘योग- सिद्धांत आणि उपयोजन’ या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले होते.
या परिसंवादाचे प्रमुख अतिथी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना हे असून परिसंवादातील सर्वांनीच योगाच्या सिद्धांताचा पाया बळकट असल्याशिवाय त्याचे उपयोजन पूर्णत्वाला येऊ शकत नाही, असे मत मांडले.