मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेले ताणतणाव दूर करण्यासाठी योगासने उपयुक्त आहेत. शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश केल्यास सुदृढ आणि निरोगी राष्ट्राची निर्मिती शक्य असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.वांद्रे रेक्लमेशनजवळील योगा पार्क येथे उपराष्ट्रपती नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा करण्यात आला. या वेळी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, पालिका आयुक्त अजय मेहता आदी उपस्थित होते. योग ही भारताने जगाला दिलेली मौल्यवान भेट आहे. सकारात्मक विचार विकासासाठी आवश्यक असून त्यासाठी योगाभ्यास गरजेचा असल्याचे नायडू म्हणाले.भारतीय प्राचिन चिकित्सा पद्धती असलेल्या योगाला पुन्हा लोकमान्यता मिळाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोत जागतिक योग दिनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर आज जगातील १७५ देशांमध्ये योग दिनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जातो. शरीर व मन या दोघांना तंदुरुस्त ठेवण्याचे काम योगासनाच्या माध्यमातून होते. तरुणाईने आधुनिक जीवनशैली अंगीकारतानाच योगाभ्यासदेखील केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.या वेळी उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री यांच्यासह उपस्थित मान्यवर आणि मुंबई पोलीस दल आणि महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगासने केली.
योगाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 5:13 AM