Join us

योगविद्येशी आपल्या देशाचे नाते घट्ट- भगतसिंह कोश्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:39 AM

सांताक्रुझच्या ‘द योगा इन्स्टिट्यूट’ला १०१ वर्षे पूर्ण

मुंबई : योगविद्येशी आपल्या देशाचे घट्ट नाते असून आजच्या काळातही आपल्या देशातील योगशिक्षणाची परंपरा जिवंत ठेवण्यामध्ये ‘द योग इन्स्टिट्यूट’ या संस्थेने मोलाचे कार्य केले आहे. आज योगविद्येने परदेशात आपली ओळख निर्माण केली असून तिथल्या लोकांनीही त्याचा स्वीकार केला आहे. योगविद्या जागतिक बाजारपेठेत रुजविण्यासाठी ‘द योग इन्स्टिट्यूट’ने मोलाचा वाटा उचलला असून योग परंपरेचा अंगीकार करण्यासाठी संस्थेने लोकांना मदत केली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.सांताक्रुझ येथील ‘द योग इन्स्टिट्यूट’ या संस्थेला २८ डिसेंबर रोजी १०१ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने शनिवारी योग केंद्रात १०१ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी भगतसिंह कोश्यारी बोलत होते. तसेच महानगरपालिकेच्या शाळांमध्ये द योग इन्स्टिट्यूटतर्फे मोफत योग शिक्षण सुरू केले आहे, त्यालाही यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.द योग इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. हंसाजी जयदेव योगेंद्र म्हणाल्या, द योग इन्स्टिट्यूटची १०१ वर्षे आणि महानगरपालिका शाळांतील आमची २५ वर्षे साजरी करताना खूप आनंद होत आहे. योगविद्येबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना योग्य ज्ञान देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. लोकांच्या दैनंदिन आयुष्यात योगविद्येला विशेष स्थान देऊन त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. दरम्यान, या कार्यक्रमाला ६० महानगरपालिका शाळांचे मुख्याध्यापकही उपस्थित होते.

टॅग्स :योगभगत सिंह कोश्यारी