होय, योगेश सावंत कार्यकर्ता; सभागृहात आरोप, रोहित पवारांचा माध्यमांसमोर खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:51 PM2024-02-29T12:51:08+5:302024-02-29T12:51:55+5:30
तुम्ही गुंडावर कारवाई करणार नाही. पण या सामान्य कार्यकर्त्यांवर कारवाई करणार, एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांवर एसआयटी लावता, पण गुंडावर नाही असा आरोप रोहित पवारांनी केला.
मुंबई - Rohit Pawar on BJP ( Marathi News ) सांताक्रुझ पोलिसांनी अटक केलेल्या योगेश सावंत प्रकरणी भाजपा आमदारांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. यावेळी योगेश सावंत आणि रोहित पवारांचा संबंध काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना खुलासा केला आहे. होय, योगेश सावंत हा कार्यकर्ता असून त्याची चूक काय? असा सवाल रोहित पवारांनी केला.
आमदार रोहित पवार म्हणाले की, पोलिसांनी योगेश सावंतला पकडलं, त्याचा जबाब नोंदवला. एक दिवस पोलीस ठाण्यात ठेवले. आज त्याला कोर्टात घेऊन चाललेत. मी स्वत: त्याला भेटण्यासाठी चाललोय. उगाच भाजपानं नाटके करू नये. तो कार्यकर्ता आहे. त्याने काय चूक केली? एका युट्यूब चॅनेलने सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत घेतली ती त्याने त्याच्या सोशल मीडियावर टाकली. आता तुम्ही त्या युट्यूब चॅनेलवर कारवाई करत नाही. ज्याने मुलाखत घेतली त्याच्यावर काही करत नाही. मात्र या कार्यकर्त्यांवर तुम्ही कारवाई करता असा आरोप पवारांनी केला.
त्याचसोबत भाजपा आमदारांनी मांडलेला प्रश्न हा देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी होता. ३ दिवसांपूर्वी एक बैठक झाली. त्यात फडणवीस चिडले होते. भाजपाच्या कुणीही आमदारांनी त्यांच्या बाजूने बोलले नाहीत. आता त्यादिवसापासून आजपर्यंत भाषणात सामान्य व्यक्ती कुठे दिसत नाही. पण देवेंद्र फडणवीसांचे नाव सारखे दिसते. त्यामुळे एखाद्या नेत्याला खुश करण्यासाठी तुम्ही कार्यकर्त्याचे नाव घेत असाल तर आम्हीही शांत बसणार नाही असा इशारा रोहित पवारांनी दिला.
दरम्यान, भाजपाकडून दबावाचं राजकारण केले जात आहे. गुंडाचा वापर केला जाईल हे मी बोललो होतो. तुम्ही गुंडावर कारवाई करणार नाही. पण या सामान्य कार्यकर्त्यांवर कारवाई करणार, एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांवर एसआयटी लावता, पण गुंडावर नाही. भाजपा सत्तेत आल्यानंतर गुंड जेलबाहेर आले. पुण्यात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जिथे धंगेकर निवडून आले तिथे किती गुंड फिरत होते. त्याचा अभ्यास करा मग कळेल भाजपा गुंडाचा वापर सहजपणे करते. गुंडावर कारवाई करत नाही.परंतु सोशल मीडियात काही लिहिलं म्हणून कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाते यातून भाजपाची विचारसरणी आपल्याला दिसते असा आरोप आमदार रोहित पवारांनी केला.