Join us

राहुल गांधी यांच्याविरोधातील व्हिडीओ प्रकरणी योगेश सोमण यांनी माफी मागावी; एनएसयूआयची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 6:03 AM

मुंबई विद्यापीठात आंदोलन; कुलगुरूंच्या कार्यालयाला लावले टाळे

मुंबई : सोशल मीडियावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलेला व्हिडीओ अपलोड केल्याचे प्रकरण मुंबई विद्यापीठाचे अ‍ॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांना भोवले आहे. सोमण यांनी गांधी घराण्याची बदनामी केल्याचा आरोप करत नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडियाने (एनएसयूआय) मंगळवारी मुंबई विद्यापीठात आंदोलन करत कुलगुरूंच्या कार्यालयाला टाळे ठोकले. एनएसयूआयच्या शिष्टमंडळाला कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतरच टाळे उघडण्यात आले.

माझे नाव राहुल सावरकर नसून, माझे नाव राहुल गांधी असल्याचे सांगत मी माफी मागणार नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका सभेत केले होते. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांनी फेसबुक आणि ट्विटरवर स्वत:चा एक व्हिडीओ अपलोड केला. आधीच मर्कट आणि त्यात मद्य प्यायलेला अशी तुझी अवस्था आहे, तुझ्या पप्पूगिरीचा मी जाहीर निषेध करतो; कारण सावरकर आडनाव घेण्याची तुझी लायकी नाही, असे वादग्रस्त विधान या व्हिडीओतून सोमण यांनी केले होते. खरेतर, तू गांधीही नाही कारण त्यांच्यामध्ये आणि तुझ्यात काहीच साम्य नाही. तुला मिळालेल्या गांधी आडनावाचा तू आधी इतिहास जाणून घे, अशी खरमरीत टीका त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केली होती. त्यानंतर सोमण हे मुंबई विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थेत एका जबाबदार पदावर असून त्यांच्या या वक्तव्यामुळे गांधी घराण्याची बदनामी झाली आहे. याचा राग विद्यार्थ्यांच्या मनात आहे. सोमण यांच्या व्हिडीओमुळे मुंबई विद्यापीठाचे नाव बदनाम झाले आहे, असा दावा एनएसयूआयकडून करण्यात आला. तसेच त्यांच्यावर या प्रकरणी कारवाई करावी या मागणीसाठी एनएसयूआयने मंगळवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या कार्यालयासमोर सोमण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. कुलगुरूंनी पोलिसांना बोलावल्यानंतर एनएसयूआयच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयाला टाळे ठोकले.निलंबन न केल्यास तीव्र आंदोलनआरएसएसचे एजंट योगेश सोमण यांना मुंबई विद्यापीठात राजकारण करायचे असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही. कुलगुरूंनी योगेश सोमण यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. विद्यापीठाने त्यांच्या निलंबनाची कारवाई न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू.- निखिल कांबळे, राष्ट्रीय सचिव, एनएसयूआई, प्रभारी दिल्ली

टॅग्स :मुंबईराहुल गांधी