Join us

योगी आदित्यनाथांच्या पुतळ्याचे दहन; प्रियांका गांधींना ताब्यात घेतल्याने प्रदेश काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 6:26 AM

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या विरोधात शुक्रवारी दादर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

मुंबई : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या विरोधात शुक्रवारी दादर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. सोनभद्र येथे हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने ताब्यात घेणे हे बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. यावेळी योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचेही दहन करण्यात आले.उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कृतीचा निषेध करून थोरात म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे बुधवारी जमिनीच्या वादातून गोळीबार करून दहा जणांची हत्या केली आहे. हिंसाचारात बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना भेटायला जाणे गुन्हा आहे का? उत्तर प्रदेश पोलिसांनी नेत्यांना अटक करण्याऐवजी गुन्हेगारांना अटक करावी. उत्तर प्रदेशात गुन्हेगार खुलेआम हत्या करत आहेत, दरोडे घालत आहेत. समाजकंटक दंगली घडवत आहेत. त्यांच्यावर कारवाई किरण्याऐवजी विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक का करत आहेत, उत्तर प्रदेशात सर्वसामान्यांच्या हक्कांची गळचेपी सुरू असून हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे, असे थोरात म्हणाले.तर, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची अटक निषेधार्ह असून, भाजपाच्या या दंडेलशाहीविरोधातील लढा यापुढेही सुरूच राहील, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना दिला आहे. भाजप सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा नेहमीच प्रयत्न करते. आज प्रियांका गांधी सोनभद्र येथे जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. सरकारच्या आदेशाशिवाय अशी अटक होऊच शकत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.